scorecardresearch

रिझर्व्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत किरकोळ महागाई दर पुन्हा साडेसहा टक्क्यांवर

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.७२ टक्के पातळीवर होता.

रिझर्व्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत किरकोळ महागाई दर पुन्हा साडेसहा टक्क्यांवर
प्रातिनिधिक फोटो- इंडियन एक्स्प्रेस

नवी दिल्लीः किरकोळ महागाई दराने रिझर्व्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत, सरलेल्या जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकाला गाठल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किमतीत वाढीने हा परिणाम साधल्याचे दिसून येते.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.७२ टक्के पातळीवर होता. ती या दराची २०२२ सालातील नीचांकी पातळी होती. त्या आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.८८ टक्के नोंदविण्यात आला होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये तो ६.०१ टक्के नोंदला गेला होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 14 February 2023: ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, दागिने करण्याआधी तपासा आजचे दर

अन्नधान्य घटकांसाठी महागाईचा दर जानेवारीमध्ये ५.९४ टक्के होता, जो डिसेंबरमधील ४.१९ टक्के पातळीवरून लक्षणीय उसळलेला दिसून आला. यापूर्वी अन्नधान्य महागाईने ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के असा उच्चांक नोंदवला होता. किरकोळ महागाई दराची पातळी रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने व्याजाचे दर ठरविताना महत्त्वाची ठरते. हा दर कमी-जास्त दोन टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांच्या मर्यादेत राखला जावा, याची जबाबदारी केंद्र सरकारने मध्यवर्ती बँकेवर सोपविली आहे.

तथापि गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सलग नऊ महिने महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे, कायद्याने निर्धारित लक्ष्याच्या मर्यादेत राखण्यात अपयश आल्याने त्याची कारणमीमांसा लेखी स्वरूपात मध्यवर्ती बँकेला सरकारकडे करणे भाग ठरले होते. तर वाढत्या महागाईला लगाम म्हणून रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून १० महिन्यांत सहा वेळा एकूण अडीच टक्क्यांची (रेपो दर) व्याजदर वाढ केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चालू वर्षातील पहिल्या द्विमासिक आढावा बैठकीत रेपो दर पाव टक्क्यांनी वाढविण्यात आला असून, यापुढेही महागाईलक्ष्यी हे व्याजदर वाढीचे चक्र सुरू राहण्याचे संकेत रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2023 at 13:17 IST

संबंधित बातम्या