मुंबई: पुढील तीन वर्षांत देशातील स्टेनलेस स्टीलची मागणी ७-८ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असून, नवोन्मेष, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मकता, क्षमतावर्धनासाठी या उद्योगासाठी समर्पित राष्ट्रीय धोरण आखण्याची मागणी ‘इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशन’ने (आयएसएसडीए) ने बुधवारी केली.
सरलेल्या २०२४-२५ मध्ये स्टेनलेस स्टीलचा एकूण वापर ४८ लाख टनांवर पोहोचला, जो वर्षागणिक सुमारे ८ टक्के वाढ दर्शवितो, असे ‘आयएसएसडीए’चे अध्यक्ष राजमणि कृष्णमूर्ती यांनी गोरेगांवस्थित नेस्को संकुलात आयोजित ‘ग्लोबल स्टेनलेस-स्टील एक्स्पो २०२५’ या आंतरराष्ट्रीय मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. देशांतर्गत उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर केला जात नाही, तर सुमारे ३० टक्के मागणी ही आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळे या क्षेत्राची अस्सल क्षमता खुली करणारे, ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देणारे आणि स्पर्धात्मकतेस हातभार लावणारे सरकारी धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतात दरडोई स्टीलचा वापर सुमारे ३.४ किलो आहे, जो ६ किलो या जागतिक सरासरीपेक्षा कमी असून, देशांतर्गत उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी प्रदान करणारे आहे. सरकारचा भरही देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्रीत असल्याकडे कृष्णमूर्ती यांनी लक्ष वेधले.
स्टेनलेस स्टीलचा वापर आता केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ते आता भारताच्या अणुऊर्जा, वैद्यकीय, अक्षय्य ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राचे भविष्य घडवत आहे, असे जिंदाल स्टेनलेसचे अध्यक्ष रतन जिंदाल म्हणाले. समान संधी आणि या क्षेत्रातील नवकल्पनांना धोरणकर्त्यांनी चालना द्यावी, असे त्यांनीही आग्रही प्रतिपादन केले.
शुक्रवार, ६ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या आणि व्हिर्गो कम्युनिकेशन्सद्वारे आयोजित या प्रदर्शन व परिषदेसाठी पोलाद उद्योगातील १०,००० हून अधिक देशी-विदेशी प्रतिनिधी, धोरणकर्ते व जागतिक तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.