नवी दिल्लीः देशाची व्यापारी तूट सरलेल्या मे महिन्यात २१.८८ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. याआधी एप्रिलमध्ये व्यापारी तूट २६.४२ अब्ज डॉलर या पाच महिन्यांतील उच्चांकी पातळीवर होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जादा आयात शुल्काची आकारणी झाल्यानंतर जागतिक पातळीवर व्यापार तणावाचे वातावरण आहे. असे असतानाही भारताच्या व्यापारी तुटीत सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात वस्तू निर्यातीत २.२ टक्के घसरण होऊन ती ३८.७३ अब्ज डॉलर आणि वस्तू आयातही १.७६ टक्के घसरणीसह ६०.६१ अब्ज डॉलर या पातळीवर राहिली. यामुळे दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट गेल्या महिन्यात कमी झाली.
भारताची वस्तू निर्यात चालू आर्थिक वर्षात एप्रिल-मे या पहिल्या दोन महिन्यांदरम्यान ७७.१९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याचवेळी वस्तू आयात १२५.२५ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे या दोन महिन्यांतील वस्तू व्यापारातील तूट ४८.३३ अब्ज डॉलर आहे. देशाची सेवा निर्यात मेमध्ये ३२.३९ अब्ज डॉलर असून, आयात १७.१४ अब्ज डॉलर आहे.
नवीन निर्यात बाजारपेठांचा शोध
इलेक्ट्रॉनिक वस्तू, रसायने, औषधे, तयार कपडे यांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. जागतिक निर्यातीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या सहा क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे भारताचे धोरण कायम राहील. जागतिक आयातीत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या देशांवरही भारताने भर दिला असून, नवीन बाजारपेठांचा शोध घेतला जात आहे, असे केंद्रीय वाणिज्य सचिव, सुनील बर्थवाल यांनी स्पष्ट केले.