नवी दिल्ली : भारताची वस्तू व्यापार तूट सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात ४,१६८ कोटी डॉलरच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचली असून, सोन्याच्या आयातीमधील वाढ आणि अमेरिकेला कमी झालेली निर्यात या दोन गोष्टी प्रामुख्याने याला कारणीभूत ठरल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले.

भारताची व्यापारी तूट सप्टेंबरमध्ये ३,२१५ कोटी डॉलर या १३ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. तर ऑक्टोबरमध्ये त्यात मोठी वाढ नोंदविण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दर्शविते. रॉयटर्सने केलेल्या अर्थतज्ज्ञांच्या पाहणीत ऑक्टोबरमध्ये व्यापारी तूट २८८० कोटी डॉलर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्या महिन्यात एकूण वस्तू निर्यात ३,४३८ कोटी डॉलर झाली. याचवेळी आयात ७,६०६ कोटी डॉलरवर होती.

तथापि सोन्याची आयात ऑक्टोबरमध्ये १,४७० कोटी डॉलरची राहिली असून, सप्टेंबरमध्ये ती ९६० कोटी डॉलर होती. खनिज तेलाची आयात ऑक्टोबरमध्ये १,४८० कोटी डॉलर असून, सप्टेंबरमध्ये ती १४०० कोटी डॉलर होती. अमेरिकेतून होणारी आयात ऑक्टोबरमध्ये ४४७ कोटी डॉलर असून, सप्टेंबरमध्ये ती ३९८ कोटी डॉलर होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ऑगस्ट अखेरीस ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले. त्यानंतर भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. असे असूनही ऑक्टोबरमध्ये भारताच्या अमेरिकेतील निर्यातीला फटका बसला आहे. भारताची अमेरिकेला निर्यात ऑक्टोबरमध्ये ६३१ कोटी डॉलरवर घसरली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ६९१ कोटी डॉलर होती. त्यात आता ९ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. भारताच्या वस्त्रोद्योग, कोळंबी, मौल्यवान रत्ने आणि दागिने यांना आयात शुल्कवाढीचा फटका बसल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसले आहे.

सेवा क्षेत्राची निर्यात ३८०० कोटी डॉलरवर

देशातील सेवा क्षेत्राची निर्यात ऑक्टोबरमध्ये ३,८५२ कोटी डॉलरवर पोहोचली असून, आयात १,८६४ कोटी डॉलर झाली आहे. सेवा क्षेत्रातील निर्यात आणि आयातीतील तफावत ही सकारात्मक असून, या क्षेत्रात १,९८८ कोटी डॉलरचा व्यापार अधिशेष दिसत आहे.