पीटीआय, नवी दिल्ली
देशातील बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात ५.१ टक्के नोंदविण्यात आला आहे. केंद्र सरकारने पहिल्यांदाच बेरोजगारीची मासिक आकडेवारी जाहीर केली आहे.देशातील रोजगारासाठी पात्र बेरोजगारांची संख्या आणि त्यांचा प्रत्यक्षातील स्थिती याची माहिती मिळावी, यासाठी सरकारने बेरोजगारीचे मासिक आकडे जाहीर करण्याचे पाऊल उचलले आहे. याआधी रोजगाराची आकडेवारी तिमाही आणि वार्षिक अशी जाहीर केली जात होती. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही मासिक आकडेवारी जाहीर केली आहे. चालू आठवडा स्थितीनुसार विदा संकलन करून बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या सात दिवस आधीच्या कालावधीतील रोजगाराच्या स्थितीच्या आधारे ही विदा संकलित करण्यात येते.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये ५.१ टक्के आहे. पुरूषांमध्ये हा दर अधिक असून, तो ५.२ टक्के आणि महिलांमध्ये ५ टक्के आहे. बेरोजगारीचे प्रमाण १५ ते २९ वयोगटात सर्वाधिक १३.८ टक्के आहे. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण जास्त असून, ते १७.२ टक्के आहे आणि ग्रामीण भागात १२.३ टक्के आहे. गेल्या महिन्यात महिलांमध्ये बेरोजगारीचा दर १५ ते २९ वयोगटात सर्वाधिक १४.४ टक्के आहे. हा दर शहरी भागात २३.७ टक्के आणि ग्रामीण भागात १०.७ टक्के करते. पुरुषांमध्येही बेरोजगारीचा दर १५ ते २९ वयोगटात सर्वाधिक १३.६ टक्के असून, तो शहरी भागात १५ टक्के आणि ग्रामीण भागात १३ टक्के आहे.
गेल्या महिन्यात रोजगारातील सहभागाचा दर ग्रामीण भागात ५८ टक्के आणि शहरी भागात ५०.७ टक्के आहे. हा दर १५ वर्षांवरील पुरूषांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात अनुक्रमे ७९ टक्के आणि ७५.३ टक्के आहे. याचवेळी हा दर १५ वर्षांवरील महिलांमध्ये ग्रामीण भागात ३८.२ टक्के आहे, असे आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसंख्येशी कामगार गुणोत्तर ५२.८ टक्के
एकूण लोकसंख्येपैकी रोजगार करणाऱ्यांची संख्या म्हणजेच लोकसंख्येशी कामगारांचे गुणोत्तर मानले जाते. गेल्या महिन्यात हे गुणोत्तर १५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये राष्ट्रीय स्तरावर ५२.८ टक्के आहे. हे गुणोत्तर ग्रामीण भागात ५५.४ टक्के असून, शहरी भागात ४७.४ टक्के असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.