Indian Rupee Fall Against US Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मंगळवारी (२३ सप्टेंबर) ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मंगळवारी देखील कायम राहिली. रुपया आज २५ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८.५३ वर पोहोचला आहे. अमेरिकेने भारतीय आयातीवर लादलेलं ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) आणि आता एच-१बी व्हिसावरील शुल्क १ लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रुपया गडगडला आहे. गुंतवणूकदार टॅरिफमुळे आधीच गोंधळले होते. त्यातच आता एच-१बी व्हिसावरील शुल्क वाढवल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. याचा थेट भारतीय भांडवली बाजार व रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला आहे.
परकीय चलन आधारित व्यापार करणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार व व्यावसायिकांनी सांगितलं की जागतिक स्तरावर आर्थिक जोखीम न पत्करण्याचं धोरण आणि व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे रुपयाचं अवमूल्यन वाढलं आहे. इंटरबँक फॉरेन एक्सचेंजवर रुपया आज डॉलरच्या तुलनेत ८८.४१ या मूल्यावर उघडला. नंतर त्याची घसरण सुरू झाली आणि ८८.५३ वर पोहोचला. काल रुपया ८८.२८ या मूल्यावर बंद झाला होता. आज त्यात २५ पैशांची घसरण झाली आहे. सोमवारी देखील रुपयाची घसरण झाली होती. सोमवारी रुपयाचं १२ पैशांनी अवमूल्यन झालं होतं.
गंभीर परिणाम भोगावे लागणार?
परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते अमेरिकेने एच-१बी व्हिसावरील शुल्क एक लाख डॉलर्स इतकं केल्यामुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीकडे घसरत चालला आहे. या नवीन नियमामुळे परदेशातून येणाऱ्या पैशांचा, परकीय गुंतवणुकीच्या वाढीचा वेग मंदावू शकतो. तसेच याचा अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. तसेच देशांतर्गत बाजारपेठेतील जोखीम टाळण्याचा दबाव वाढू शकतो. परिणामी भांडवली बाजाराची आणखी घसरण होईल.
भारतीय रिझर्व्ह बँक ही एकमेव डॉलर पुरवणारी संस्था आहे. या आठवड्यात ७,५०० कोटी रुपयांचे काही किरकोळ आयपीओ बाजारात आले, ज्यामुळे काही प्रमाणात परकीय चलन देशातं आलं. मात्र, मोठ्या प्रमाणात डॉलरची खरेदी झाल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पोकळी निर्माण होऊ लागली आहे.
फिनरेक्स ट्रेझररी अॅडव्हायजर्स एलएलपीचे खजिनदार व कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी म्हणाले, “आरबीआय बऱ्याचदा थेट चलन हस्तक्षेप करत नाही, किंवा हा हस्तक्षेप मर्यादित आहे. त्यामुळे रुपयाच्या किमतीत अस्थिरता दिसत आहे. रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. आपल्याला यासाठी काही उपाययोजना राबवाव्या लागतील.