वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्राथमिक बाजारात पुन्हा चैतन्य परतले असून कंपन्यांमध्ये प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) चढाओढ लागली आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे १८ महिन्यांत सुमारे १६० कंपन्यांकडून ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव सादर केला असून, त्यांच्याकडून एकत्रितपणे सुमारे १.६१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक (१९ अब्ज डॉलर) निधी उभारला जाणे अपेक्षित आहे.
‘युनिकस कन्सल्टेक’च्या ‘इंडिया आयपीओ इनसाइट्स’च्या ताज्या तिमाही अहवालानुसार, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. या क्षेत्रातील १४ कंपन्यांकडून सर्वाधिक सुमारे ५०,३९४ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. यामध्ये नुकत्याच विक्री पूर्ण करणाऱ्या एचडीबी फायनान्शियल, तसेच टाटा कॅपिटल आणि क्रेडिला फायनान्स अशी प्रमुख नावे आहेत.
बँकिंग आणि वित्त क्षेत्रानंतर या यादीत दुसरे स्थान सौर ऊर्जा क्षेत्राचे आहे. या क्षेत्रातील नऊ कंपन्यांनी ११,८७१ कोटी रुपयांची निधी उभारणी प्रस्तावित केली आहे. एकूणच स्वच्छ आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडे गुंतवणूकदारांच्या वाढत्या आकर्षणाचे हे लक्षण आहे. या क्षेत्रासाठी सरकारचे समर्थनाचे धोरण आणि ईएसजी-चालित भांडवली प्रवाहामुळे अधिकाधिक गुंतवणूक त्यांकडे आकर्षित होत आहेत.
अभियांत्रिकी अर्थात इंजिनीअरिंग क्षेत्रातून सर्वाधिक १६ कंपन्यांनी सेबीकडे निधी उभारणीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून १०,६४५ कोटी रुपये निधी उभारला जाणार आहे. बरोबरीनेच माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी (८ कंपन्या, ६,५३४ कोटी रुपये), फार्मा (८ कंपन्या, ५,७७५ कोटी रुपये), गृहनिर्माण अर्थात रिअल इस्टेट (६ कंपन्या, ४,८९० कोटी रुपये), रसायने (६ कंपन्या, ६,१८७ कोटी रुपये), शिक्षण/एडटेक (२ कंपन्या, ४,८५० कोटी रुपये) आणि इलेक्ट्रिकल उपकरणे (७ कंपन्या, ४,४९३ कोटी रुपये) या क्षेत्रांतील कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
विद्यमान २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत मुख्य मंचावर ९ कंपन्यांनी १३,८५१ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. तर पहिल्या तिमाहीत १५,९८४ कोटी रुपयांची निधी उभारणी झाली होती. सरासरी भागविक्रीचा आकार आणि त्यांची संख्या दोन्ही तिमाहीत सारखीच राहिली. मनोरंजक गोष्ट म्हणजे, दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांकडून ८७ टक्के नवीन समभागांची विक्री करण्यात आली. तर पहिल्या तिमाहीत आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून अधिक कंपन्यांनी निधी उभारणी केली.
गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कसा?
२०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत खुल्या झालेल्या नऊ आयपीओपैकी सुमारे ८० टक्के कंपन्यांनी पदार्पणाला सकारात्मक सूचिबद्धता अनुभवली आणि पहिल्या सत्राच्या अखेर समभागांनी सरासरी ३.१ टक्के अधिमूल्य मिळविले.