Intel CEO Lip Bu Tan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जगातील अनेक देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावल्यामुळे अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून चर्चेत असतात, काही देशांना किंवा एखाद्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांबाबत देखील ट्रम्प भाष्य करत वाद ओढावून घेत असल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर सीईओ लिप-बू टॅन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र, इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ट्रम्प यांनी केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीला विरोध करत त्यांच्या आरोपाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

सीईओ लिप-बू टॅन काय म्हटलं?

सीईओ लिप-बू टॅन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, आपण नेहमीच कायदेशीर आणि नैतिक मानकांमध्ये काम केलेलं आहे. तसेच आपल्यावर केलेले चिनी गुंतवणुकीवरील आरोप हे अतिशय चुकीचे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. दरम्यान, सिनेटर टॉम कॉटन यांनी इंटेलच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रातील राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या आरोपाबाबत लिप-बू टॅन यांनी म्हटलं की, “अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेप्रती आपली वचनबद्धता कायम आहे. अमेरिका ४० वर्षांहून अधिक काळ माझं घर आहे. मी या देशावर प्रेम करतो आणि देशाने मला दिलेल्या संधींबाबत मी मनापासून आभारी आहे.”

‘चिनी गुंतवणुकीबद्दल चुकीची माहिती’

सीईओ लिप-बू टॅन यांनी चिनी कंपन्यांमधील त्यांच्या गुंतवणुकीभोवतीच्या वादावही सविस्तर भाष्य केलं. वॉल्डेन इंटरनॅशनल आणि कॅडन्स डिझाइन सिस्टम्समधील माझ्या मागील भूमिकांबद्दल बरीच चुकीची माहिती पसरली जात असल्याचं सीईओ लिप-बू टॅन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सिनेटर टॉम कॉटन यांनी ५ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात तीन विशिष्ट प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इंटेलच्या बोर्डाला लिप-बू टॅन यांची माजी कंपनी कॅडेन्स डिझाइनमधील कायदेशीर अडचणींबद्दल माहिती होती का? त्यांनी चिनी लष्कराशी संबंधित कंपन्यांमधून पैसे काढले होते का? त्यांनी इंटेलच्या संवेदनशील संरक्षण करारांना दिलेल्या उर्वरित गुंतवणुकीची माहिती अमेरिकन सरकारला दिली होती का? असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, या सर्व आरोपांवर सीईओ लिप-बू टॅन प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळून लावले आहेत.