मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने ‘फंड ऑफ फंड (एफओएफ)’ प्रवर्गात दोन नवीन योजना खुल्या केल्या आहेत. ‘मिरॅ ॲसेट मल्टी फॅक्टर पॅसिव्ह एफओएफ’ आणि ‘मिरॅ ॲसेट गोल्ड सिल्व्हर पॅसिव्ह एफओएफ’ अशा या दोन योजना आहेत. पहिली योजना ही विविध स्मार्ट बिटा समभाग घटकांवर आधारीत, तर दुसरी योजना ही सोने आणि चांदी या मौल्यवान धातूत गुंतवणूक करणाऱ्या योजनांवर आधारीत आहे. मिरॅ ॲसेट गोल्ड ईटीएफ आणि मिरॅ ॲसेट सिल्व्हर ईटीएफ यांच्या युनिट्समध्ये त्यातून प्रामुख्याने गुंतवणूक केली जाईल.

दोन्ही योजनांचे एनएफओ ११ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑगस्ट २०२५ या काळात गुंतवणुकीसाठी खुले राहतील. योजनांतील किमान प्रारंभिक गुंतवणूक ५,००० रुपये आहे, तर त्यातील ‘एसआयपी’ किमान ९९ रुपयांपासून पुढे सुरू करता येईल. दोन्ही योजनांचे निधी व्यवस्थापन रितेश पटेल हे पाहतील.

डीएसपी म्युच्युअल फंडातर्फे फ्लेक्सीकॅप इंडेक्स फंड

डीएसपी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी ‘डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० इंडेक्स फंड’ ही नवीन योजना खुली केली आहे. ही योजना म्हणजे देशात पहिल्यांदाच उपलब्ध झालेले अल्प खर्चातील फ्लेक्सीकॅप गुंतवणूक धोरण असून, ते दर्जेदार समभाग आणि गतिमान संकेतांच्या आधारे अतिशय वेगाने गुंतवणुकीचा मिलाफ घडवून आणते. भारतात पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या फ्लेक्सीकॅप निर्देशांकाची कामगिरी या फंडाच्या कामगिरीत प्रतिबिंबीत होईल.

ऑक्टोबर २००९ पासून चक्रवाढ पद्धतीने १८.१ टक्के असा सरस परतावा दिलेल्या, निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० इंडेक्स हा या योजनेचा मानदंड निर्देशांक आहे. विशेषतः उच्च दर्जाच्या स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्सचे मूल्यांकन सध्या चढे असल्याने आणि बाजाराची दिशाही अनिश्चित असल्याने, गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’च्या माध्यमातून योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला डीएसपी म्युच्युअल फंडाने दिला आहे. याचा ‘एनएफओ’ ८ ऑगस्टला गुंतवणुकीसाठी खुला झाला असून, तो येत्या २२ ऑगस्ट २०२५ ला बंद होणार आहे.