मुंबई : आशियाई बाजारातील कमकुवत कल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरू झाल्याने सोमवारच्या अत्यंत अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी अपरिवर्तित राहिले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे.
सोमवारच्या सत्रात मुम्बाशेअर बाजाराचा निर्देशांक ९.६१ अंशांनी वधारून ८३,४४२.५० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८३,५१६.८२ च्या उच्चांकी आणि ८३,२६२.२३ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५,४६१.३० पातळीवर बंद झाला.
अमेरिका-भारत व्यापार करारासंबंधित चिंतेमुळे बाजार अस्थिरतेत भर घातली. ९ जुलै रोजी भारतासह डझनभर देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त कराच्या ९० दिवसांच्या निलंबन कालावधीचा शेवट झाला. अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर २६ टक्के अतिरिक्त आयात शुल्क जाहीर करण्यात आले आहे.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक, ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि आयटीसी यांचे समभाग वधारले. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, मारुतीच्या समभागांची कामगिरी निराशाजनक राहिली.
अमेरिकेच्या व्यापार कराराच्या घोषणेआधी बाजारातील सहभागीनीं आक्रमक भूमिका घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले. परिणामी संपूर्ण सत्रात निर्देशांक मोठ्या प्रमाणात मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होते –सुंदर केवट, विश्लेषक, आशिका इन्स्टिट्यूशनल इक्विटी
सेन्सेक्स ८३,४४२.५० ९.६१ ( ०.०१%)
निफ्टी २५,४६१.३० ०.३ ( ०.००%)
तेल ६८.५० ०.२९
डॉलर ८५.८७ ४७ पैसे