मुंबई: वर्ष २०२४ मध्ये प्रारंभिक समभाग विक्री बाजारात अनेक कंपन्यांनी समभाग सूचिबद्ध करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सध्याची बाजारातील अस्थिरता आणि जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरणामुळे सरलेल्या तीन आठवड्यांमध्ये मुख्य बाजार मंचावर एकाही नवीन कंपनीचा समभाग सूचिबद्ध झालेला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये १६ कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्या होत्या, त्या तुलनेत जानेवारीमध्ये फक्त पाच आणि फेब्रुवारीमध्ये चार कंपन्या सूचिबद्ध झाल्या आहेत. सरलेल्या महिन्यात ॲडव्हान्स्ड सिस-टेक, एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज आणि व्हाइन कॉर्पोरेशन यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्यांचे मसुदा प्रस्ताव मागे घेत ‘आयपीओ’च्या योजना मागे घेतल्या आहेत.
वर्ष २०२४ मध्ये प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ९१ कंपन्यांनी एकत्रितपणे १.६० लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. जे किरकोळ गुंतवणूकदारांचा मजबूत सहभाग, लवचिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या खासगी भांडवली खर्चाच्या जोरावर शक्य झाले. सध्या भांडवली बाजारात आलेली मंदी आणि जागतिक शेअर बाजारांमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे ‘आयपीओं’चे प्रमाण आणि सूचिबद्धतेवर परिणाम झाला आहे.
याआधी सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांचे समभाग विशेषतः जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, त्यांचा सूचिबद्ध किंमतींवरून खाली घसरल्या आहेत. परिणामी, गुंतवणूकदारांनी नवीन सूचिबद्ध होत असलेल्या समभागांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे, असे इक्विरसचे व्यवस्थापकीय संचालक आणि गुंतवणूक बँकिंग प्रमुख भावेश शाह यांनी सांगितले.
प्राथमिक बाजाराबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक असून अनेक कंपन्या आगामी काळात ‘आयपीओ’साठी उत्सुक आहेत. ते बाजारातील परिस्थिती स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. सध्या, सेबीची मान्यता असलेल्या ४५ कंपन्या ६७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत आणि ६९ कंपन्या १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘सेबी’च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, ६९ कंपन्यांपैकी ४५ कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत मसुदा प्रस्तावपत्र दाखल केले. तर गेल्या दोन महिन्यांतच, जवळजवळ ३० कंपन्यांनी मसुदा प्रस्तावपत्र दाखल केले आहेत, असे आनंद राठी ॲडव्हायझर्सचे संचालक आणि ईसीएम इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे प्रमुख व्ही. प्रशांत राव यांनी निदर्शनास आणून दिले.