मुंबई : केंद्र सरकारच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’चे समभाग बुधवारी (२९ नोव्हेंबर) राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. समभागांच्या सूचिबद्धतेविषयी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असून भांडवली बाजार विश्लेषकांच्या मते, समभाग ३० टक्के अधिमूल्यासह म्हणजेच ४२ रुपयांच्या पातळीवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. ‘इरेडा’ची भागविक्री गेल्या आठवड्यात, प्रत्येकी ३० ते ३२ रुपये किमतीला २३ नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. गुंतवणूकदारांकडून जवळपास ३९ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद तिने मिळविला. म्हणजे अर्थातच ‘आयपीओ’साठी अर्ज केलेल्यांपैकी थोडक्याच गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात समभाग मिळविता आले आहेत.
‘सेन्सेक्स’ची २०४ अंशांची कमाई
देशांतर्गत भांडवली बाजारात मंगळवारच्या सत्रात वाहन निर्मिती, ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात उत्साहवर्धक खरेदीचा जोर दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हा खरेदीत चांगलाच सहभाग दिसून आला.
मंगळवार दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०४.१६ अंशांनी वधारून ६६,१७४.२० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६६,२५६.२० अंशांची उच्चांकी तर ६५,९०६.६५ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९५ अंशांची कमाई केली आणि तो १९,८८९.७० पातळीवर स्थिरावला.
गेल्या तीन महिन्यांमध्ये (ऑगस्ट ते ऑक्टोबर) चौफेर विक्रीनंतर, नोव्हेंबर महिन्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजार स्थिर आणि सकारात्मकता आहे. ‘ओपेक’च्या बैठकीपूर्वी तेलाच्या किमती स्थिर असल्याने देशातील तेल वितरक कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहे. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या चांगल्या कामगिरीनेही निर्देशांकांना अधिक बळ दिले आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सीमेंट, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एनटीपीसी, टायटन आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक आणि पॉवर ग्रिड यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.