मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या इन्फोसिस आणि विप्रोने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीतील आर्थिक कामगिरीचे निकाल गुरुवारी जाहीर केले. इन्फोसिसला सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ७,३६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून वार्षिक तुलनेत १३.२ टक्क्यांनी वाढला आहे, तर विप्रोचीही नफ्यात वाढीची कामगिरी आहे.

इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने गेल्या वर्षी याच तिमाहीत ६,५०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तर यंदाच्या तिमाहीत कंपनीचा महसूल ८.६ टक्क्यांनी वाढून ४४,४९० कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षी ४०,९८६ कोटी रुपयांवर होता. यातून आर्थिक वर्ष २०२६ साठी वाढीच्या अंदाजात तिने १-३ टक्क्यांवरून, २-३ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

कंपनीने या काळात ३.१ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणेजच सुमारे २७,५२५ कोटी रुपयांचे कार्यादेश प्राप्त केले आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिसमभाग २३ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला असून गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ९.५ टक्क्यांनी वाढला आहे.

विप्रोने जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात किरकोळ वाढ नोंदवली आहे. विप्रोचा निव्वळ नफा ३,२४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने ३,२०८.८ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. महसूल गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १.७ टक्क्यांनी वाढून २२,६९७.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नफा २.५ टक्क्यांनी कमी झाला असला तरी महसूल २.५ टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत ९.५ अब्ज डॉलरचे कार्यादेश प्राप्त केले आहेत. कंपनीची रणनीती स्पष्ट असून लवचिक राहून जागतिक बदलांशी जुळवून घेऊन कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात नेतृत्व करणार आहे. आमच्या ग्राहकांसाठी विप्रो इंटेलिजेंस आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, यामुळे एआय-फर्स्ट जगात भविष्य घडवण्यास मदत होईल. – श्रीनी पल्लिया, मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, विप्रो.