पीटीआय, नवी दिल्ली
जग्वार लँड रोव्हर इंडियाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत २,३५६ मोटारींची विक्री केली असून, टाटा मोटर्सच्या मालकीच्या या कंपनीची ही आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी आहे.
कंपनीने मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत १,१९४ मोटारींची विक्री केली होती. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत विक्री वाढल्याने कंपनीची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत विक्रीत १०८ टक्के वाढ झाली असून, १,३०८ मोटारींची विक्री झाली आहे. कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत मोटारींच्या विक्रीत १०२ टक्के वाढ नोंदविली होती. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा म्हणाले की, आमच्याकडे मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातून आमच्या नाममुद्रेची बाजारपेठेतील वाढती ताकद समोर आली असून, ग्राहकांच्या मनातही आमची उत्पादने घर करीत आहेत.
हेही वाचा – डेटा सेंटरमधील गुंतवणूक वाढणार! तीन वर्षांत १० अब्ज डॉलरचा ओघ येण्याचा अंदाज
मागील वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मागणीतील वाढीत सातत्य दिसून येत आहे. पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत मागणीत ९० टक्के वाढ झालेली आहे. रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि डिफेंडर या मोटारींना सर्वाधिक मागणी आहे. एकूण मागणीत त्यांचे प्रमाण ७२ टक्के आहे.