मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्यातील संयुक्त भागीदारीचा उपक्रम असलेल्या जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटला बाजार नियामक ‘सेबी’कडून पाच म्युच्युअल फंड योजना सुरू करण्याची मान्यता बुधवारी मिळाली. हे पाचही प्रस्तावित फंड हे निष्क्रिय व्यवस्थापन धाटणीचे इंडेक्स फंड आहेत.
जिओब्लॅकरॉक निफ्टी ५० इंडेक्स, जिओब्लॅकरॉक निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड, जिओब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड, जिओब्लॅकरॉक निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्स फंड आणि जिओब्लॅकरॉक निफ्टी ८-१३ वर्षे जी-सेक इंडेक्स फंड अशा पाच फंडांना सेबीने बुधवारी मान्यता दिली आहे. पाच योजनांपैकी चार समभागसंलग्न इंडेक्स फंड तर एक रोखेसंलग्न इंडेक्स फंड आहे.
या आधी जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने त्यांच्या पहिल्यावहिल्या योजनांच्या ७ जुलै रोजी नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) बंद झाल्याची घोषणा केली, ज्यातून एकूण १७,८०० कोटी रुपये गुंतवणूक गोळा केली गेली आहे. जिओब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड अशा या तीन रोखेसंलग्न म्युच्युअल फंड योजनांमधून हा निधी उभारण्यात आला आहे. तीन दिवस सुरू राहिलेल्या ‘एनएफओ’ला ९० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि ६७,००० हून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळाल्याचे फंड घराण्याकडून सांगण्यात आले.