पीटीआय, नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचा दर सरलेल्या जून महिन्यात ५.६ टक्क्यांवर स्थिर राहिला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने देशातील नोकरीसाठी पात्र असलेल्या बेरोजगारांच्या प्रमाणाचे प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पहिला मासिक नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणाच्या (पीएलएफएस) मे महिन्यापासून सुरू केलेल्या प्रथेनुसार मंगळवारी जूनची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
मे महिन्यातील ५.६ टक्के बेरोजगारीचा दर जून महिन्यातही कायम राहिला आहे. जो एप्रिलमध्ये ५.१ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त होता. महिलांसाठीचा बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यात ५.६ टक्क्यांवर घसरला, जो मे महिन्यात ५.८ टक्के होता. तर १५-२९ वयोगटातील युवांमध्ये बेरोजगारीचा दर जूनमध्ये १५.३ टक्क्यांवर पोहोचला, जो मे २०२५ मध्ये देशभरात १५ टक्के नोंदवला गेला होता.
शहरी भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये १८.८ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील महिन्यात १७.९ टक्के होता, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर १३.८ टक्के आहे. ग्रामीण भागातील पुरुष आणि महिला दोघांसाठीही बेरोजगारीचा दर कमी झाला आहे, हे मे २०२५ च्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये कामगारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि बेरोजगारांच्या संख्येत घट झाल्यामुळे शक्य झाले आहे.
१५-२९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यात १७.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मे महिन्यात देशभरात १६.३ टक्के होता, ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांचा समावेश आहे.
शहरी बेरोजगारीचा दर जूनमध्ये २५.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मे महिन्यात २४.४ टक्के होता आणि गावातील बेरोजगारीचा दर जून महिन्यात १३.७ टक्के होता, जो मे महिन्यात गावांमध्ये १३ नोंदवला होता. जूनमध्ये १५-२९ वयोगटातील पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढून १४.७ टक्क्यांवर पोहोचले, जे मे महिन्यात १४.५ टक्के होते.