आर्थिक संकटात सापडलेली सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) फर्स्ट सिटीझन्स बँकेने ताब्यात घेतली होती. आता या बँकेतील ५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यातची घोषणा फर्स्ट सिटीझन्स बँकेने केली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेतील सुमारे ५०० म्हणजेच ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. याबाबत फर्स्ट सिटीझन्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रँक होल्डिंग म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. त्यात ग्राहककेंद्री सेवा देणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश नसेल. याचबरोबर भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार नाही.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सातत्याने वाढ केली होती. यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक अडचणीत आली होती. सुरूवातीला बँकेकडील राखीव गंगाजळी आणि सरकारी रोखे यांचे मूल्य कमी झाले होते. त्यानंतर बँकेचे ग्राहक असलेल्या तंत्रज्ञान कंपन्यांनी ठेवी काढून घेण्याचा सपाटा लावला. बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने नवउद्यमी आणि तंत्रज्ञान कंपन्या होत्या. सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली त्यावेळी देशातील १६ व्या क्रमांकाची मोठी बँक होती. अमेरिकेच्या इतिहासातील ती दुसरी सर्वांत मोठी बुडणारी बँक ठरली होती. त्यानंतर अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था संकटात सापडली. या बँकिंग संकटामुळे नंतर सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक या बँका बुडाल्या तर इतर अनेक बँका अडचणीत आल्या.

हेही वाचाः बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज वितरणात अव्वल; २६०२ कोटींचा मिळवला निव्वळ नफा

खरं तर अमेरिकेतील बुडालेली सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) आता फर्स्ट सिटिझन्स बँक अँड ट्रस्ट कंपनीने ताब्यात घेतली आहे. तेथील ठेव विमा महामंडळ अर्थात ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’कडून दिवाळखोर बँकेच्या सर्व ठेवी आणि कर्जे ही फर्स्ट सिटिझन्स बँकेकडे वर्ग केला जात असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यत: तंत्रज्ञान क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या कोसळण्याने संपूर्ण जगाला हादरा देण्यासह बँकिंग जगतावर संकटाची मालिकेचीच सुरुवात केली होती. युरोप-अमेरिकेतील बँकिंग जगताला गमावलेला आत्मविश्वास कमावण्यासाठी फर्स्ट सिटिझन्स बँकेबरोबर विलीनीकरणाचा हा करार उपकारक ठरेल, अशी नियामक यंत्रणांची भावना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः एलआयसीचा तिमाही नफा वाढून १३,१९१ कोटी झाल्यानंतर शेअर्समध्येही उसळी