मुंबई: भूषण स्टील अँड पॉवर लिमिटेडची दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे जेएसडब्ल्यू स्टीलला झालेली विक्री रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेण्यासह, विविध पर्यायांवर कर्जदात्या बँकांकडून येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी अशोक चंद्रा यांनी बुधवारी सांगितले.
पीएनबीच्या नेतृत्वाखालील कर्जदारांच्या एका गटाने ४७,२०४ कोटी रुपयांच्या परतफेड न झालेल्या कर्जासंबंधाने भूषण स्टीलला दिवाळखोरी प्रक्रियेत ओढले होते. २६ जुलै २०१७ रोजी सुरू झालेल्या या निराकरण प्रक्रियेत भूषण स्टीलच्या संपादनासाठी जेएसडब्ल्यू स्टील यशस्वी बोलीदार ठरली आणि त्या मोबदल्यात १९,७०० कोटी रुपये देण्याचा तिचा प्रस्ताव मंजूरही झाला होता. तथापि गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आता भूषण स्टीलला अवसायानांत काढावे लागणार आहे.
संपादनकर्त्या जेएसडब्ल्यू स्टीलच्या मंजूर झालेल्या योजनेनुसार, पीएनबीला सुमारे ३,००० कोटी रुपये मिळाले आहेत, असे चंद्रा यांनी नमूद केले. मात्र ही प्रक्रिया रद्दबातल करून, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचा निर्णय उलटवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व कर्जदात्यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. भविष्यातील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी आम्ही पुढील २-३ दिवसांत बैठक घेणार आहोत,” असे त्यांनी तिमाही आकडेवारी जाहीर केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
तिमाहीत नफ्यात ५१ टक्के वाढ
जानेवारी-मार्च २०२५ तिमाहीत पीएनबीचा नफा ५१ टक्क्यांनी वाढून ४,५६७ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा ३,०१९ कोटी रुपये होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न देखील ३ टक्के वाढून १०,७५७ कोटी रुपये झाले. तर गेल्या वर्षी हा आकडा १०,३६३ कोटी रुपये होता. बँकेने भागधारकांना १४५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी २.९० रुपये लाभांश दिला जाणार आहे.