मुंबई : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडकडे प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ४ लाख कोटी रुपयांचा ओघ आला आहे. आयपीओसाठी आतापर्यंत आलेली ही सर्वाधिक बोली आहे.‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’चा आयपीओ ७ ऑक्टोबरला खुला झाला होता आणि ९ ऑक्टोबरपर्यंत आयपीओ खुला होता. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ७.१३ कोटी समभाग विक्री करणार आहे. मात्र त्यातुलनेत कंपनीकडे ३८५ कोटींहून अधिक समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून ११,६०७ कोटी रुपयांचा उभारण्याचा मानस आहे. मात्र कंपनीला गुंतवणूकदारांनी ४ लाख कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने आयपीओसाठी १,०८० रुपये ते १,१४० रुपये प्रति समभाग किंमतपट्टा कंपनीने निश्चित केला होता.
गुंतवणूकदारांनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओला मोठी पसंती दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कर कपातीमुळे कंपनीला या धोरण सुधारणांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. चांगली सूचिबद्धता नफा वाढीच्या मजबूत शक्यतांमुळे या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला, असे मत मेहता इक्विटीजचे संशोधन वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी व्यक्त केले.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओसाठी पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असलेल्या भागाला १६६.५१ पट अधिक प्रतिसाद मिळाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीला २२.४४ पट आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव गटाला ३.५४ पट बोली प्राप्त झाल्या.
सर्व विक्रम मोडीत
यापूर्वी हा विक्रम बजाज हाऊसिंग फायनान्सच्या नावावर होता, ज्याच्या सप्टेंबर २०२४ मध्ये ६,५६० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ३.२४ लाख कोटी रुपयांच्या एकूण बोली प्राप्त झाल्या होत्या. त्याआधी, कोल इंडियाच्या २०१० च्या आयपीओसाठी २.३६ लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या, तर टाटा टेक्नॉलॉजीजच्या नोव्हेंबर २०२३ च्या आयपीओला १.५६ लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या आणि प्रीमियर एनर्जीजच्या २०२४ च्या इश्यूला १.४८ लाख कोटी रुपये मिळाले होते.