LG Electronics India MD Hong Ju Jeon speech in Hindi watch video : दक्षिण कोरियाची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर जोरदार पदार्पण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होंग जू जिओन (Hong Ju Jeon) यांनी केलेले खास भाषण हे सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण भाषण हे चक्क हिंदीतून केले.
जिओन यांची एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाचे एमडी म्हणून जानेवारी २०२३ मध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी लिस्टिंग समारंभादरम्यान इंग्रजी किंवा कोरियनऐवजी चक्क हिंदी भाषेत भाषण भाषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी गुंतवणुकदारांना एक आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या कृतीने अनेकांची मने जिंकून घेतली, त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांकडून त्यांना भरभरून दाद मिळाली. जिओन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला.
एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाचे एमडी काय म्हणाले?
“नमस्ते. सन्माननीय निमंत्रित, विशेषतः एनएसईचे सीईओ आशिष चौहान, या ऐतिहासिक प्रसंगी एलजी इलेक्ट्रॉनिक्सबरोबर सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. हा आयपीओ एलजीसाठी केवळ एक आर्थिक उपलब्धी नाही तर एका नवीन भविष्याची सुरुवात आहे, जी आम्ही भारतीय लोकांबरोबर मिळून तयार करू . भविष्यात, आम्ही लाइफ गुड्सच्या भावनेला जास्तीत जास्त भारतीयांबरोबर वाटून घेऊ. याबरोबर आम्ही ज्या दृष्टिकोनासाठी वचनबद्ध आहोत त्यांना मूल्य प्रदान करू. शेवटी, मी भारत सरकार, सेबी, एनएसई, आमचे भागीदार, एलजी कुटुंब आणि आमच्या ग्राहकांचे मनापासून आभार मानू इच्छितो. धन्यवाद. नमस्ते.”
सोशल मीडियावर या भाषणाचे अनेकांनी कौतुक केले आहे. बऱ्याच जणांनी हिंदीत बोलण्यासाठी घेतलेल्या कष्टांची स्तुती केली आहे.
आयपीओला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनीच्या शेअर्सनी १४ ऑक्टोबर रोजी बाजारात पदार्पण करताच ५०.४ टक्के इतकी मोठी वाढ नोंदवली. यामुळे कंपनीचे बाजार मुल्य १३.०७ अब्ज डॉलर्स (सुमारे १.१५ लाख कोटी रुपये) झाले, ज्यामुळे या कंपनीच्या दक्षिण कोरियातील मूळ कंपनीचे बाजार मूल्य १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८,८०० कोटी रुपये) पेक्षा जास्त झाले आहे. २००८ नंतर भारतात सर्वाधिक बोली लागलेल्या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवल्यामुळे ही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया वर १७१०.१ रुपयांवर लिस्टेड झाले होते, त्यानंतर ते वाढून १७१४.९० रुपयांपर्यंत पोहोचले. या शेअर्सची इश्यू प्राइस ही ११४० रुपये होती.