मुंबई: एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी शशिधर जगदीशन यांच्यावर वित्तीय गैरव्यवहाराचे आरोप ‘लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट’ने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केले असून त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणी न्यासाने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, या संबंधाने रविवारी सायंकाळी शेअर बाजाराला सूचित करतानाच, न्यासाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावणारा खुलासाही बँकेने केला आहे.
एचडीएफसी बँकेने या प्रकरणी भांडवली बाजाराला माहिती देताना स्पष्ट केले की, लीलावती न्यासाचे विश्वस्त असलेल्या मेहता कुटुंबीयांच्या मालकीच्या स्प्लेन्डर जेम्स लिमिटेड या कंपनीला एचडीएफसी बँकेसह इतर बँकांनी १९९५ मध्ये कर्ज दिले होते. हे कर्ज त्यांनी थकविले आहे. त्यांच्यावर ३१ मे २०२५ अखेरीस व्याजासह ६५.२२ कोटी रुपयांची देणी थकलेली आहेत. या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेकडून सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र या कर्ज वसुलीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी मेहता कुटुंबीयांकडून बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या जात आहेत. मेहता कुटुंबीयांनी केलेले आरोप निराधार आणि खोटे असून, कर्जफेड टाळण्याच्या दृष्ट हेतूने ते करण्यात आले असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
लीलावती न्यासाने जगदीशन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याबाबत न्यासाचे विश्वस्त प्रशांत किशोर मेहता म्हणाले की, हा आमचा व्यक्तिगत वाद नाही. तसेच, व्यावसायिक गैरसमजातून आम्ही ही तक्रार केलेली नाही. शशिधर जगदीशन यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी सत्य दडपून ठेवले असून, न्याय्य प्रक्रियेला बाधा आणली आहे. त्यामुळे विश्वासार्हता कायम राखण्यासाठी बँकेने स्वत:हूनच शशिधरन यांची प्रमुख पदावरून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी.