नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या संचालकांसाठी सुयोग्य व्यक्तीची निवड करणाऱ्या वित्तीय सेवा संस्थात्मक मंडळाने (एफएसआयबी), स्टेट बँक अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवारांची मंगळवारी मुलाखत घेणार आहे, असे सूत्रांनी सोमवारी सांगितले.  

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचे विद्यमान दिनेश खरा यांच्या जागी प्रथेनुसार, स्टेट बँकेच्या सध्या कार्यरत पात्र व्यवस्थापकीय संचालकांपैकी एकाची वर्णी लागणार असून, त्यांच्याच मुलाखती मंगळवारी घेतल्या जाणे अपेक्षित आहे. खरा हे येत्या २८ ऑगस्ट रोजी बँकेच्या अध्यक्षपदावरूनही सेवानिवृत्त होत आहेत.  तेव्हा ते ६३ वर्षांचे होतील आणि स्टेट बँकेच्या अध्यक्षपदासाठी निर्धारीत सर्वोच्च वयोमर्यादा त्यांच्याकडून गाठली जाईल.  

हेही वाचा >>> पलंग, पिशव्या अन् चपलांच्या बॉक्समध्येही ऐवज! IT च्या धाडीत सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीपश्चात मंडळाकडून नावाची शिफारस केली जाईल आणि अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती घेईल. एफएसआयबी मंडळाचे प्रमुख भानू प्रताप शर्मा, हे केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे माजी सचिव आहेत. सरकारने नियुक्त केलेल्या निवड मंडळाचे सदस्य वित्तीय सेवा सचिव, सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत.
मंडळाच्या इतर सदस्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिमेश चौहान, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक दीपक सिंघल आणि पूर्वाश्रमीच्या आएनजी वैश्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र भंडारी यांचा समावेश आहे.