मुंबई, नवी दिल्ली : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’च्या दरात शुक्रवारी कपात केली.  ‘सीएनजी’च्या दरात ८ रुपयांनी आणि घरगुती पाईप गॅसच्या म्हणजे ‘पीएनजी’च्या दरात ५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

आता शहरात ‘सीएनजी’ प्रतिकिलो ७९ रुपये आणि ‘पीएनजी’ प्रति घनमीटर ४९ रुपयांना मिळेल. हे दर ८ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे ‘एमजीएल’कडून सांगण्यात आले.

दरम्यान, नैसर्गिक वायूच्या किमती नियंत्रणमुक्त करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीची दरकपात प्रत्यक्ष लाभकारक ठरेल काय, याबद्दल विश्लेषक शंका व्यक्त करत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने नैसर्गिक वायूच्या किमतीबाबतचा किरीट पारीख समितीच्या अहवालातील शिफारशींना मंजुरी दिली आहे. यानुसार, देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती आता आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमतीशी जोडल्या जाणार आहेत. ही किंमत आयात खनिज तेलाच्या महिन्यातील सरासरी किमतीच्या १० टक्के आणि प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी ४ डॉलर या मर्यादेपर्यंत आणि ती ६.५ डॉलरपेक्षा अधिक असणार नाही. पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक वायू किमतीतील वाढीसारखा अप्रिय निर्णय टाळण्यास अहवालाची ही शिफारस सरकारला साह्य़भूत ठरेल. मात्र अहवालातील सोयीचे तेवढेच सरकारने स्वीकारले तर त्यातून सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत ९ ते ११ टक्के या दरम्यान कपात वितरकांकडून होऊ शकेल, असे क्रिसिल रेटिंग्जने म्हटले आहे. सरकारने आधीचेच किंमत धोरण ठेवले असले तर किमती वाढल्या असत्या, परंतु पारीख समितीने २०२७ मध्ये दर नियंत्रणमुक्त करण्याच्या केलेल्या शिफारशीवर सरकारने निर्णय घेतलेला नाही, याकडे या पतमानांकन संस्थेने लक्ष वेधले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैसर्गिक वायूचा ७.९२ डॉलर दर निश्चित नवी दिल्ली: केंद्र सरकारने नैसर्गिक वायूचा दर नवीन किंमत धोरणानुसार शुक्रवारी जाहीर केला. उर्वरित एप्रिल महिन्यासाठी (८ ते ३० एप्रिल कालावधीसाठी) हा दर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी (एमएमबीटीयू) ७.९२ डॉलर निश्चित करण्यात आला आहे. ग्राहकांसाठी मात्र हा दर ६.५ डॉलर असा असेल, असा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आदेश काढला. पारीख समितीच्या शिफारशीनुसार, आयात खनिज तेलाच्या सरासरी किमतीच्या १० टक्के हा दर आहे. सरकारने स्वीकारलेल्या नवीन किंमत सूत्रानुसार, नैसर्गिक वायूच्या किमतीवर प्रति एमएमबीटीयू ६.५ डॉलरची कमाल मर्यादा घातली आहे. यामुळे ग्राहकांसाठी हा दर ६.५ डॉलर असेल.