नवी दिल्ली : चारचाकी मोटारींवरील वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’मध्ये कपात, याचबरोबर सणासुदीच्या काळामुळे ग्राहकांसाठी विशेष सवलतीला जमेस धरून, देशातील प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक खप असलेल्या मारुती सुझुकीने कार खरेदीस इच्छुकांना किमतीत कपातीचा आकर्षक नजराणा प्रस्तुत करत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत, अर्थमंत्रालयाने नवीन जीएसटी दर रचनेची घोषणा केली. या बैठकीत, अर्थमंत्रालयाने छोट्या श्रेणीतील कारसाठी मोठी सवलत जाहीर केली. तथापि जीएसटी कपाती व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अतिरिक्त सवलती देखील देऊ केल्या आहेत. या पावलांचा उद्देश त्यांच्या कारला अधिक परवडणारे बनविणे आणि त्यांचा बाजारातील हिस्सेदारी वाढवणे असा आहे. सुधारीत किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत त्या लागू राहतील.
केंद्र सरकारने छोट्या मोटारींवरील जीएसटी कमी केला आहे. यामुळे वाहन कंपन्यांकडून मोटारींच्या किमतीत कपात करून सुधारित किमती जाहीर केल्या जात आहेत. मारुती सुझुकीने मोटारींच्या किमतीत ४६ हजारांपासून, १ लाख २९ हजार रुपयांपर्यंत कपात केली गेली आहे. याचबरोबर कंपनीने विशेष सणोत्सवी सवलतीही ग्राहकांसाठी जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या मोटारींच्या नवीन किमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार असून, त्या कायम राहतील.
कोणत्या मॉडेलवर किती सवलत?
मारुती सुझुकीच्या अर्टिगा मोटारीच्या किमतीत ४६ हजार ४०० रुपये कपात करण्यात आली असून, जिम्नी ५१ हजार ९०० रुपये, एक्सएल ६ वर ५२ हजार रुपये, इनव्हिक्टो ६१ हजार ७०० रुपये, इकोसाठी ६८ हजार रुपये सवलत कार खरेदीदारांना मिळेल. या शिवाय, इग्निस ७१ हजार ३०० रुपये, वॅगन-आर ७९ हजार ६०० रुपये, स्विफ्ट ८४ हजार ६०० रुपये, बलेनो ८६ हजार १०० रुपये, डिझायर ८७ हजार ७०० रुपये, सेलेरियो ९१ हजार १०० रुपये, ग्रँड व्हिटारा १ लाख ७ हजार रुपये, फ्रॉन्क्स व अल्टो के-टेन १ लाख १२ हजार ६०० रुपये, ब्रिझा १ लाख १२ हजार ७०० रुपये आणि एस-प्रेसोच्या किमतीत १ लाख २९ हजार ६०० रुपये अशी कपात करण्यात आली आहे.