नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने निवडक वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. हॅचबॅक प्रकारातील स्विफ्टच्या किंमतीत २५,००० पर्यंत वाढ केली आहे. तर एसयूव्ही ग्रँड विटाराच्या सिग्मा श्रेणीच्या किंमतीमध्ये देखील १९,००० रुपयांची वाढ केल्याचे मारुती सुझुकी इंडियाने भांडवली बाजारांना कळवले आहे.

आता, स्विफ्ट ५.९९ लाख ते ८.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) किंमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहे. कंपनीच्या संकेतस्थळानुसार, ग्रँड विटाराच्या सिग्माची किंमत १०.८ लाख रुपये आहे. नवीन किमती १० एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.

हेही वाचा…सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान

मानेसर प्रकल्प विस्तार

मारुती सुझुकी इंडियाने मानेसर येथील वाहन उत्पादन क्षमता प्रतिवर्ष एक लाखांनी वाढवली आहे. तसेच कंपनीचा येत्या ७ ते ८ वर्षात वाहन उत्पादन क्षमता वार्षिक ४ लाखांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.

हेही वाचा…मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला

बुधवारच्या सत्रात मारुती सुझुकीचा समभाग १.६० टक्क्यांच्या घसरणीसह १२,६८४.६८ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ३.९८ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.