पीटीआय, मुंबई
जून महिन्यात टोमॅटो, बटाटे आणि बॉयलर चिकनच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घरगुती जेवणाच्या थाळीला महागाईचा तडका मिळाला आहे. टोमॅटोची आवक ८ टक्क्यांनी घटल्यामुळे किमतीत मासिक ३६ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे थाळीचा खर्च वाढला. याव्यतिरिक्त, बटाट्याच्या किमतीत ४ टक्क्यांनी वाढ झाली शिवाय मांसाहारी थाळीच्या बाबतीत, बॉयलरच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईची झळ बसल्याचे एका अहवालात समोर आले आहे.
‘क्रिसिल’ या देशांतर्गत रेटिंग एजन्सीच्या एका शाखेच्या ‘रोटी, राईस, रेट’ या मासिक अहवालानुसार, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये शाकाहारी थाळीची किंमत ३ टक्क्यांनी वाढून २७.१ रुपये झाली (मे महिन्यात २६.२ रुपये.) त्याचप्रमाणे, मांसाहारी थाळीची किंमत ४ टक्क्यांनी वाढून ५४.८ रुपये झाली. (मे महिन्यात ५२.६ रुपये) ‘क्रिसिल इंटेलिजन्स’चे संचालक, पुषन शर्मा यांनी सांगितले की, हंगामी बदलांमुळे भाजीपाल्याच्या किमती वाढणार असल्याने थाळीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या बाबतीत, नवीन आवक नसल्यामुळे आणि रब्बी पिकाची नियंत्रित विक्री झाल्यामुळे किमतीत माफक वाढ अपेक्षित आहे, तर टोमॅटोच्या बाबतीत, उन्हाळी पेरणी कमी झाल्यामुळे किमती वाढतील.
वार्षिक तुलनेत किमतीत घट
तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की, वार्षिक तुलनेत शाकाहारी जेवणाच्या किमती ८ टक्क्यांनी (२७.१ रुपये प्रति थाळी) आणि मांसाहारी जेवणाच्या किमती ६ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. याचे मुख्य कारण जून २०२४ मधील उच्च आधारभूत किंमत हे होते.
थाळीकारणाची संकल्पना काय?
देशाचे तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी वर्ष २०१९-२० च्या आर्थिक पाहणी अहवालात जडजंबाळ आकडेमोड करण्याऐवजी अभिनव ‘थाळीनॉमिक्स’ (थाळीकारण) ही संकल्पना पुढे आणली. सामान्यत: शाकाहारी आणि मांसाहारी ताटातील अन्नपदार्थासाठी देशाच्या विविध भागांत पडणाऱ्या किमतींचे त्या ठिकाणच्या दैनंदिन वेतनमानाशी गुणोत्तर जुळविले जाते.