नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरामध्ये कपात करण्यात आल्याने उत्पादक कंपन्यांनी विक्री न झालेल्या वस्तूंच्या कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) बदल करावा, अशी सूचना केंद्रीय अन्न व ग्राहक कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी केली.

सरकारने दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात केली आहे. याची अंमलबजावणी २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी समाज माध्यमावर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, नवीन जीएसटी दरानुसार उत्पादक कंपन्या आणि आयातदारांनी उत्पादनांची कमाल किरकोळ किंमत ठेवावी. त्यांनी यंदा ३१ डिसेंबरपर्यंत विक्री न होणाऱ्या उत्पादनांवरील किमती जीएसटी दरानुसार बदलाव्यात.

नवीन जीएसटी दर हे उत्पादनांवर दिसणे आवश्यक आहेत. उत्पादनांवरील नवीन कमाल किरकोळ किंमत त्यावर देणे गरजेचे आहे. याचवेळी उत्पादनावरील जीएसटी कपातीच्या आधीची किंमतही दिसेल याची काळजी घ्यावी. त्यामुळे जीएसटी कपातीनंतर किमतीत किती बदल झाला हे सामान्य नागरिकांच्या लक्षात येईल. याचबरोबर कंपन्यांनी उत्पादनांच्या किमतीत झालेला बदल जाहिराती अथवा सार्वजनिक सूचनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवावा. हे पाऊल पारदर्शकतेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्यासाठी आवश्यक आहे, असेही जोशी यांनी नमूद केले आहे.

महत्वाच्या सूचना

– विक्री न झालेल्या उत्पादनांवरील एमआरपी बदला.

– उत्पादनांवर नवीनसोबत जुनी किंमतही दिसावी.

– जीएसटीनंतर बदलेल्या किमती ग्राहकांच्या निदर्शनास आणून द्या. – उत्पादनांच्या किमती कमी झाल्याचे ग्राहकांपर्यंत जाहिरातींमधून पोहोचवा.