2000 Rupee Notes: बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ ला अचानक २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याची घोषणा केली. फक्त ७ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर २ हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणण्यात आल्या. बँकिंग सिस्टीममध्ये रोख रक्कम इंजेक्ट करण्यासाठी आरबीआयने घाईघाईने २ हजार रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीमध्ये आणल्या. पण तुम्हाला माहिती आहे का? २ हजारांच्या नोटा छापण्यासाठी किती पैसे खर्च झाले? याचा खुलासा सरकारने संसदेत केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, २ हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी एकूण १७,६८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
२ हजारांच्या नोटा छापण्यासाठी १७,६८८ कोटी रुपये खर्च
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अर्थमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सरकारने आतापर्यंत २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईवर किती पैसा खर्च केला? या प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, आरबीआयच्या म्हणण्यानुसार, २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईवर एकूण १७,६८८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
हेही वाचाः Money Mantra : सुरक्षित अन् असुरक्षित कर्जामध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या
काँग्रेसचे लोकसभा खासदार मनीष तिवारी यांनी आरबीआय आणि सरकारला २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या कारणाबाबत प्रश्न केला असता, या प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, आरबीआयने स्वच्छ नोट धोरण विचारात घेत चलन व्यवस्थापन ऑपरेशन अंतर्गत १९ मे २०२३ रोजी २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढून घेण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, २ हजार रुपयांच्या ८९ टक्क्यांहून अधिक नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या आणि ४ ते ५ वर्षांत या नोटांचा अवधी संपणार आहे. पंकज चौधरी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी इतर मूल्यांच्या बँक नोटा पुरेशा प्रमाणात स्टॉकमध्ये आहेत.
७.४० लाख कोटी रुपयांचा पुरवठा
वित्त राज्यमंत्री म्हणाले की, २०१६-१७ ते २०१८-१९ दरम्यान RBI ने ७.४० लाख कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटांचा पुरवठा केला आहे. RBI ने १९ मे २०२३ रोजी बँकिंग प्रणालीतून २ हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याची घोषणा केली तेव्हा बँकिंग प्रणालीमध्ये ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. ३० नोव्हेंबरपर्यंत यापैकी ३.४६ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या असून, ९७६० कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात उरल्या आहेत, ज्या बँकिंग व्यवस्थेत परत यायच्या आहेत.