मुंबई: गेल्या काही वर्षांतील सर्वात मजबूत मुसंडीसाठी देशाचा भांडवली बाजार सज्ज झाला आहे, असा मॉर्गन स्टॅन्लेचा आशावादी सूर असून, डिसेंबर २०२६ अखेरीस सेन्सेक्स १,०७,००० पर्यंतची कमाल पातळी अथवा सध्याच्या पातळीपेक्षा १३ टक्क्यांची माफक वाढ गृहित धरल्यास ९५,००० च्या पातळीपर्यंत मजल मारू शकतो, असा तिने मंगळवारी अंदाज वर्तविला.

गेल्या तीन दशकांमधील सर्वात कमकुवत कामगिरीनंतर २०२६ हे शेअर बाजारासाठी मजबूतपणे सावरण्याचेच नव्हे, तर सप्टेंबर २०२४ पासून गमावलेला जोम पुन्हा मिळविण्यासह बाजारासाठी हे दमदार मुसंडीचेही वर्ष ठरेल, असे मॉर्गन स्टॅन्लेने अहवालात म्हटले आहे.

भारताच्या दीर्घकालीन वृद्धीगाथेला ताज्या अनेकांगी सुधारणांमुळे बळकटी मिळाली आहे, ज्यामुळे मागील ३१ कॅलेंडर वर्षांमधील उदयोन्मुख बाजारपेठांच्या भारताच्या शेअर बाजाराची कामगिरी ही २०२५ मध्ये सर्वात वाईट राहिली आहे. ही परिस्थिती उलटवली जाण्याची मजबूत शक्यता येत्या वर्षात दिसून येते. मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजानुसार, माफक वाढ जरी गृहित धरली तरी डिसेंबर २०२६ पर्यंत सेन्सेक्समध्ये १३ टक्क्यांची वाढ अर्थात त्याने ९५,००० अंशांची पातळी गाठताना दिसून येईल. तेजीच्या बाजारात सेन्सेक्सने एक लाख ७,००० अंशांची पातळी दिसून येणेही शक्य असल्याचा अहवालाचा अंदाज आहे.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या आठवड्यात दुसरी एक जागतिक संस्था गोल्डमन सॅक्सने देखील पुढील डिसेंबरपर्यंत निफ्टीचे लक्ष्य २९,००० अंशांचे असल्याचे सांगणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०२५ मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारतीय बाजार मागे पडले असले तरी, मजबूत अर्थव्यवस्था आणि कंपन्यांच्या कमाईतील उत्तम सुधारणा पाहता हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, येत्या आठवड्यात भारत-अमेरिका दरम्यान वाढलेल्या आयात शुल्कासंबंधित समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये आणखी पाव टक्क्यांची कपात आणि सकारात्मक तरलता वातावरण देखील बाजार तेजीला पूरक ठरेल. बाजाराच्या सापेक्ष मूल्यांकनांमध्ये लक्षणीय सुधारणा पाहता, येत्या काळात सकारात्मक वाढीच्या शक्यतेला मोठा वाव दिसून येतो.

परदेशी गुंतवणूकदारांची स्थिती आजच्या घडीला भारतीय बाजाराच्या दृष्टीने नकारात्मक बनले असल्याची अहवालानेही दखल घेतली आहे. सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत त्यांची भारतातील समभाग धारणा १७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी पहिल्यांदाच देशांतर्गत संस्थात्मक धारणेच्या अर्थात १८ टक्क्यांपेक्षा खाली घसरली आहे. तथापि बाजाराचे मूल्यांकन सामान्य झाले आहे आणि देशांतर्गत निधी प्रवाह संरचनात्मकदृष्ट्या मजबूत राहण्याची स्थिती पाहता, विदेशी गुंतवणुकीचा ओघ देखील वाढेल, असे अनुमान असल्याचे अहवाल सांगतो.