लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जागतिक पातळीवरील नकारात्मक घटनांमुळे सलग दोन सत्रातील प्रमुख निर्देशांकांमधील तेजी ओसरली. अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन धोरणांमुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने बाजारात निराशेचे वातावरण होते. मात्र प्रमुख निर्देशांक ८० हजारांवर तगून राहण्यास यशस्वी ठरला.

मंगळवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०५.७९ अंशांनी घसरून ८०,००४.०६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३११.१८ अंश गमावत ७९,७९८.६७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २७.४० अंशाची घसरण झाली आणि तो २४,१९४.५० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>बाह्य कर्जांविना वाढ साधण्याचा अदानी समूहाचा दावा; गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी आर्थिक सुस्थितीची ग्वाही

ट्रम्प पुढील वर्षात २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारताच मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर नवीन शुल्क लादण्याची योजना आखत असल्याच्या चिंतेमुळे जागतिक भांडवली बाजारांमध्ये घसरण झाली आहे. सलग दोन सत्रातील सकारात्मकतेनंतर बाजाराला तेजीला विराम मिळाला. मात्र, व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक मात्र तेजीसह स्थिरावले. अविरत समभाग विक्रीचा मारा थांबवत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनवले आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>निष्क्रिय ‘ईपीएफ’ खात्यात ८,५०५ कोटी पडून; सहा वर्षांत रकमेत पाच पटीने वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स आणि एसईझेड ३.२३ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एनटीपीसी, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टुब्रो आणि पॉवर ग्रिडचे समभाग पिछाडीवर होते. दुसरीकडे, एशियन पेंट्स, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारले. परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात ९,९४७.५५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स – ८०,००४.०६ -१०५.७९ -०.१३%

निफ्टी – २४,१९४.५० -२७.४० -०.११%

डॉलर – ८४.३२ ३ पैसे

तेल – ७३.५८ ०.७१%