नवी दिल्ली : भारतातील पहिली देशांतर्गत उत्पादित सेमीकंडक्टर चिप या वर्षी बाजारात आणली जाईल, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचा संकल्प असून, देशांतर्गत उत्पादनाद्वारे, भारताचे वाढते आयात परावलंबित्व कमी करण्याचे यामागे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुरूप प्रत्यक्षात वेगवान प्रगती सुरू असल्याचे दर्शविणारा आणि उज्ज्वल भविष्यवेध घेणारा अहवाल पुढे आला आहे.
जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर उद्योगाचा वेगाने विस्तार सुरू आहे. या उद्योगाची जागतिक बाजारपेठ २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. उद्योगाच्या वाढीचा वार्षिक दर २०२३-२०३० या कालावधीत सरासरी सुमारे १० टक्के राहील. जागतिक पुरवठा साखळीत भारताकडून महत्त्वाचे स्थान बजावले जाईल.
जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर उत्पादनांत, आशिया प्रशांत विभागाचा ६० टक्के वाटा कायम राहणार असला, तरी वेगवान विस्तार साधत भारतातील सेमीकंडक्टर बाजारपेठ २०३२ पर्यंत १००.२ अब्ज डॉलरवर जाणे अपेक्षित आहे, असा आशावाद युनियन बँकेच्या ताज्या संशोधन अहवालाने सोमवारी वर्तविला. २०२३ मध्ये ३४.३ अब्ज डॉलरच्या घरात असलेली देशातील या बाजारपेठेतील उलाढाल तिपटीने वाढण्याचा अहवालाचा अंदाज आहे.
भारताने २०२२ मध्ये ५१.६ कोटी डॉलरची सेमीकंडक्टर उत्पादने निर्यात केली. ही निर्यात प्रामुख्याने अमेरिका, हाँगकाँग आणि दक्षिण आफ्रिकेत करण्यात आली. मात्र, या निर्यातीपेक्षा आयातीची मात्रा अधिक आहे. देशात २०२२ मध्ये ४.५५ अब्ज डॉलरच्या सेमीकंडक्टर उपकरणांची आयात झाली. त्यात चीन, सिंगापूर आणि व्हिएतनाममधून प्रामुख्याने आयात झाली, असे युनियन बँकेच्या अहवालाने नमूद केले आहे.
सेमीकंडक्टरसाठी दोन तृतीयांश मागणी दूरसंचार आणि औद्योगिक प्रक्रिया या क्षेत्रातून येणार आहे. त्यात मोबाईल, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि इतर उद्योगांचा समावेश आहे. नवतंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत असून, त्यात ५ जी दूरसंचाराचे तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि इलेक्ट्रिक वाहने यामुळे सेमीकंडक्टरला मागणी आणखी वाढणार आहे, असेही अहवालाने म्हटले आहे.