मुंबई : मंगळवारच्या सत्रातील अस्थिर बाजारात बँकिंग आणि ऊर्जा समभागांमधील नफावसुलीने चार सत्रातील तेजीची मालिका खंडित झाली. मात्र प्रमुख निर्देशांक निफ्टी २५ हजार अंशांच्या पातळीवर टिकून आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३.४९ अंशांनी घसरून ८२,३९१.७२ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने सकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली होती. सत्रात त्याने २३५.५८ अंशांची कमाई करून ८२,६८०.७९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्शही केला होता. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये विक्रीच्या माऱ्याने दिवसभरात त्याने ८२,२४०.४० या सत्रातील नीचांकी पातळीही दाखविली. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण क्षेत्रातील वाढीमुळे सलग पाचव्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २५ हजार पातळीच्यापुढे टिकून आहे. त्यात किरकोळ वाढ होऊन तो २५,१०४.२५ पातळीवर स्थिरावला. गेल्या चार सत्रांत, निफ्टीने ५६० अंशांची कमाई केली तर सेन्सेक्सने १,७०७.७ अंशांची भर घातली.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागात घसरण झाली. तर टेक महिंद्र, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,९९२.८७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ८२,३९१.७२ -५३.४९ (-०.०६%)

निफ्टी २५,१०४.२५ १.०५ (०%)

तेल ६७.१९ ०.३९ टक्के

डॉलर ८५.६२ -४ पैसे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग चार सत्रातील तेजीनंतर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणामुळे संमिश्र वातावरण होते. गुंतवणूकदार सध्या लंडनमध्ये होणाऱ्या अमेरिका-चीन व्यापार चर्चेच्या निकालाची वाट पाहत आहेत. – अजित मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष, संशोधन, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड.