नवी दिल्ली: बँक खातेधारकांनी ग्राहकांची ओळख पटविणारी ‘केवायसी’बाबतची वैध कागदपत्रे बँकेकडे दिली असल्यास, ती अद्ययावत करण्यासाठी अथवा नूतनीकरणासाठी प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

बँक खातेधारकाचा पत्ता बदलला नसेल आणि ‘केवायसी’ तपशिलात कोणताही बदल नसल्यास, खातेदार ईमेल, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमातून आवश्यक केवायसीसंबंधी माहिती बँकेला पाठवू शकतो. यामुळे ‘केवायसी’ची माहिती नूतनीकरणासाठी बँकांनी खातेधारकांना शाखेमध्ये येण्याची सक्ती न करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर शक्तिकांत दास यांनी दिल्या आहेत. मध्यवर्ती बँकेने गुरुवारी प्रसिद्ध मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘केवायसी’ तपशिलात कोणताही बदल नसल्यास, डिजिटल माध्यमातून केवायसी नूतनीकरणाची प्रक्रिया ग्राहकांनी पूर्ण करणे पुरेसे आहे. शिवाय बँकांनी ग्राहकांना  डिजिटल पर्यायांच्या माध्यमातून माहिती कळवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यात म्हटले आहे.