पीटीआय, नवी दिल्ली

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात ‘सीसीपीए’ने ॲपआधारित प्रवास-सुविधेच्या प्रदात्या उबरला जलद सेवेसाठी ग्राहकांकडे भाड्याव्यतिरिक्त अधिकची बक्षीस रक्कम आगाऊ मागण्याच्या प्रकाराबद्दल बुधवारी नोटीस बजावली.

भाड्याव्यतिरिक्त बक्षीस रक्कम अर्थात ‘ॲडव्हान्स टिप’ची पद्धत अत्यंत चिंताजनक असून यामुळे ग्राहकांकडे अतिरिक्त पैशाची मागणी केली जात आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरील टिप्पणीत नमूद केले. जलद सेवा मिळविण्यासाठी वापरकर्त्यांना भाड्याव्यतिरिक्त बक्षीस रक्कम देण्यास भाग पाडणे हे अनैतिक आणि अन्यायकारक आहे. हा प्रकार अनुचित व्यापार प्रथेत मोडणारा असल्याने प्राधिकरणाने याची दखल घेत ‘उबर’ला नोटीस बजावली आहे. उबरप्रमाणेच ओला या ॲपआधारित सेवेतही अशी प्रथा सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाड्याव्यतिरिक्त बक्षिसाची रक्कम ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाकडून आपखुषीने दिली जाणारी आणि प्रशंसा या रूपात असते. मात्र त्यावर आगाऊ हक्क सांगून, ती आकारली जाऊ शकत नाही. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाने उबरला नोटीस बजावली असून, स्पष्टीकरण मागितले आहे. सर्व ग्राहक संवादांमध्ये कंपन्यांनी निष्पक्षता, पारदर्शकता आणि दायीत्व राखले पाहिजे, असे जोशी यांनी त्यांच्या समाजमाध्यमावरील टिप्पणीत म्हटले आहे.