मुंबई: आघाडीचे रोखे आगार असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) बुधवारपासून सुरू झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीने गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळविला आणि ‘आयपीओ’ खुला झाल्याच्या काही तासातच शत प्रतिशत म्हणजेच संपूर्ण भरणा पूर्णही केला.
आयपीओच्या माध्यमातून ४,०११ कोटींची निधी उभारणी एनएसडीएल करणार आहे. गुंतवणूकदारांना पुढील दोन दिवस म्हणजे येत्या १ ऑगस्टपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ३.५१ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराने बुधवारी सकाळी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांकडून सुमारे ३.९१ कोटी समभागांची मागणी नोंदवण्यात आली. याचा अर्थ, आयपीओ खुला होताच पहिल्या काही तासात १.११ पट अधिक मागणी नोंदविणारा त्यात भरणा झाला.
बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी दिसून आली, त्यांच्यासाठी राखीव भागासाठी १.४८ पटीने अधिक मागणी आली, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागासाठी १.१८ पटीने अधिक मागणी नोंदवली गेली. मात्र पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी असलेला राखीव भागासाठी ७२ टक्के भरणा झाला आहे. एनएसडीएलने मंगळवारी सुकाणू गुंतवणूकदारांकडून १,२०१ कोटी रुपयांच्या निधीची उभारणी केली. कंपनीने आयपीओसाठी ७६० ते ८०० रुपये प्रति समभाग किंमतपट्टा निश्चित केला आहे. एनएसडीएलचे समभाग येत्या ६ ऑगस्ट रोजी बाजारात सूचिबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
आयपीओच्या माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), आयडीबीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यासारखे विद्यमान भागधारक एनएसडीएलमधील त्यांची आंशिक हिस्सेदारी ओएफएसच्या माध्यमातून विक्रीला खुली केली आहे. संपूर्ण ‘ओएफएस’ प्रकारचा हा आयपीओ असल्याने, एनएसडीएलला या माध्यमातून उभारला जाणारा कोणताही निधी मिळणार नाही. ‘सेबी’कडे दाखल केलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, कंपनीने या ‘आयपीओ’तून विद्यमान भागधारकांकडील ५.०१ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
एनएसडीएलला जुलैमध्येच आयपीओ खुला करणे बंधनकारक होते. कारण, कंपनीला ‘सेबी’कडून भांडवली बाजारात समभाग सूचिबद्ध करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली गेली होती. भारतात समभागांचे ‘डिमटेरियलायझेशन’ (डिमॅट) करण्यात आले, त्यात या एनएसडीएलने महत्त्वाची भूमिका बजावली. १९९६ मध्ये डिपॉझिटरी कायदा आल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. आज भारतातील दोनपैकी एक अग्रणी रोखे आगार (डिपॉझिटरी) म्हणून ही कंपनी कार्यरत आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) ही देशातील दुसरी डिपॉझिटरी असून या कंपनीचे समभाग हे २०१७ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाले आहेत.
कामगिरी कशी?
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, एनएसडीएलचा निव्वळ नफा २४.५७ टक्क्यांनी वाढून ३४३ कोटी रुपये झाला आणि एकूण उत्पन्न १,५३५ कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत १२.४१ टक्क्यांनी अधिक आहे. छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांवर केंद्रीत सीडीएसएलच्या तुलनेत, एनएसडीएल ही उच्च लाभदायी अशा संस्थात्मक गुंतवणूकदार ग्राहकांवर केंद्रीत संस्था आहे.