पीटीआय, नवी दिल्ली
डिसेंबर २०२४ मध्ये अखेर देशातील एकूण दूरसंचार ग्राहकांची संख्या वाढून ११८.९ कोटींपुढे गेली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ट्रायच्या अहवालानुसार, मोबाइल आणि फिक्स्ड-लाइन दोन्ही विभागांमध्ये जिओने सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) नुसार नोव्हेंबरमध्ये एकूण दूरसंचार सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या ११८.७ कोटी होती. रिलायन्स जिओ इन्फोकॉम ४७.६५ कोटी ग्राहक संख्येसह आघाडीवर होता, त्यानंतर भारती एअरटेल २८.९३ कोटी आणि व्होडाफोन आयडिया १२.६३ कोटी ग्राहक संख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. शहरी दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये ६५.९८ कोटी होती, ती डिसेंबरमध्ये ६६.३३ कोटी झाली आहे, तर ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या याच कालावधीत ५२.७२ कोटींवरून ५२.५६ कोटीपर्यंत कमी झाली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये वायरलेस ग्राहकांची संख्या ११४.६४ कोटी होती, जी डिसेंबर २०२४ मध्ये ११५ कोटी झाली, म्हणजेच मासिक वाढीचा दर ०.१७ टक्के नोंदवला गेला आहे. डिसेंबर अखेर वायरलेस टेलिडेन्सिटी ८१.६७ टक्क्यांपर्यंत वाढली, जी नोव्हेंबर अखेर ८१.५९ टक्के होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिलायन्स जिओने या कालावधीत ३९ लाख वायरलेस ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने १० लाख ग्राहकांची निव्वळ भर घातली. तर, व्होडाफोन आयडियाने १७.१५ लाख वायरलेस ग्राहक गमावले. बीएसएनएल आणि एमटीएनएलने देखील अनुक्रमे ३.१६ लाख आणि ८.९६ लाख वायरलेस ग्राहक गमावले. खासगी सेवा प्रदात्यांनी वायरलेस ग्राहकांचा ९१.९२ टक्के बाजार हिस्सा घेतला, तर बीएसएनएल आणि एमटीएनएलचा बाजार हिस्सा केवळ ८.०८ टक्के राहिला आहे.