वृत्तसंस्था, कॅलिफोर्निया:
कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनव्हीडियाचे बाजार मूल्य ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. जगातील महाकाय कंपन्या ॲपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सर्वाधिक बाजार भांडवल असलेली अमेरिकी कंपनी आहे. अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘एनव्हिडिया’च्या समभागांमध्ये वाढ झाल्याने तिचे बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरवर (४ ट्रिलियन डॉलर) झेपावले आहे.
तिचा शेअर बुधवारच्या सत्रात २.५ टक्क्यांनी वाढून १६४ डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. कृत्रिम प्रज्ञेला वाढती मागणी आणि कंपनीच्या उच्च-कार्यक्षमता चिप्स या तांत्रिक प्रगतीचा कणा आहेत. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल ३.७५ ट्रिलियन डॉलर तर ॲपलचे बाजार भांडवल ३.१० ट्रिलियन डॉलर आहे.
उल्लेखनीय म्हणजे एनव्हीडिया, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल हे भारत, फ्रान्स, ब्राझील, इटली आणि कॅनडा देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. या महाकाय जागतिक विस्तार असलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या निरंतर चढाओढ सुरू आहे. अलीकडच्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्टने ॲपलला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते आता गेल्या वर्षपासून एनव्हिडियाने ते हिरावून घेतले आहे.
समभाग मूल्यात वाढ
विद्यमान २०२५ मध्ये एनव्हीडियाचे समभाग मूल्य २२ टक्क्यांनी वधारले आहे, तर गेल्यावर्षी ते १७३ टक्क्यांनी वधारले होते.