अमेरिकी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ओरॅकलने भारतात नोकरकपातीस सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे जागतिक स्तरावर खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर (ओसीआय) आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर (ओएफएसएस) विभागांमध्ये कर्मचारी कपात झाली आहे. ज्याचा शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. कंपनीचे भारतात सुमारे ३०,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
गेल्या आठवड्यात, भारतातील ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरमधील (ओएफएसएस) अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. प्रभावित कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पूर्ण पगार, ओरॅकलमधील प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी एक महिन्याचा मूळ पगार आणि देय ग्रॅच्युइटी आणि रजा रोखीकरणाची रक्कम यासह समाविष्ट असलेले ‘सीव्हेरन्स पॅकेज’ देण्यात आले.
एम४ किंवा मॅनेजर लेव्हल ४ ते आयसी१ किंवा वैयक्तिक योगदानकर्ता लेव्हल १ पर्यंतच्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. नव्याने रुजू झालेल्यांना देखील कामावरून कमी केले गेले आहे.
ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ग्लोबल बिझनेस युनिटचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक सोनी सिंग यांनी ४ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक बोलावली होती, असे एका सूत्राने सांगितले. कंपनी सध्या कठीण काळातून जात आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत असून त्यांना इतर कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी पाठवून शक्य तितकी मदत करा, असे आवाहन देखील करण्यात आले. ओरॅकल गेल्या महिन्यापासून अमेरिका, भारत, कॅनडा आणि फिलीपिन्ससह जगभरातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. आतापर्यंत एकूण जागतिक मनुष्यबळापैकी १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली गेल्याचा अंदाज आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भारतात कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही. कामावरून काढून टाकण्याबाबत आणि जागतिक धोरणातील बदलांबाबत ओरॅकलकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.