Pakistan Share Market : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाराजावर झाला आहे. पाकिस्तानात केएसई १ हजार ७१७ अंकांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी घसरले असून ११३,१५४.८३ वर पोहोचला आहे, असं वृत्त डॉनने दिलं आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पुढच्या २४ ते ३६ तासांत भारताकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं म्हटलं जातंय.
सोमवारी, केएसई-१०० निर्देशांक ११४,०६३.९० वर बंद झाला, जो १,४०५.४५ अंकांनी किंवा १.२२% ने घसरला. भारताने पाकिस्तानविरोधात ठाम निर्णय घेतले आहेत. सार्क व्हिसा रद्द करणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परत बोलावणे, आदी निर्णयांमुळे पाकिस्तानी वित्तीय बाजारात मोठा परिणाम झला आहे. २२ एप्रिलच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी, कराची स्टॉक एक्सचेंजचा केएसई-१०० निर्देशांक उघडल्यानंतर लगेचच २% पेक्षा जास्त घसरला होता.
पाकिस्तान मंत्र्याने नेमकं काय म्हटलं?
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी एक्स माध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले, “पुढच्या २४ ते ३६ तासांत भारताकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची आमच्याकडे विश्वसनीय माहिती आहे. पहलगाममधील घटनेत पाकिस्तानचा निराधार संबंध जोडून हा हल्ला करण्याचा विचार भारताकडून केला जात आहे.”
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मागच्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलत त्यांची कोंडी केली. दरम्यान पाकिस्तानने मात्र पहलगाम घटनेपासून स्वतःचे हात झटकले आहेत. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करत असताना भारताने नवी दिल्लीतील १०० हून अधिक विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना हल्ल्याची माहिती दिली. तसेच जागतिक नेत्यांशीही चर्चा करून याबाबत कळवले.