पीटीआय, नवी दिल्ली : आघाडीच्या टाटा समूहाप्रमाणेच पेटीएमची मूळ कंपनी असलेली वन९७ कम्युनिकेशन्स आता १०० टक्के भारतीय मालकीची कंपनी बनली आहे. चिनी उद्योजक जॅक मा यांच्या ॲन्ट फायनान्शियलने मंगळवारी पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्समधून बाहेर पडून त्यांचा संपूर्ण ५.८४ टक्के हिस्सा सुमारे ३,८०३ कोटी रुपयांना विकला आहे.

आम्ही मारुतीइतकेच भारतीय आहोत, असे विधान पेटीएमचे संस्थापक आणि मुख्याधिकारी विजय शेखर शर्मा यांनी दिलेल्या मुलाखतीत, कंपनीच्या मालकीसंदर्भातील रचनेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना वारंवार सांगितले होते. आता एकेकाळी प्रतीकात्मक मानले जाणारे हे विधान आता वास्तव प्रतिबिंबित करते, जिथे पेटीएमचे १०० टक्के भागधारक आता भारतीय असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय कंपनी आहे.

ॲन्ट समूहाने त्यांच्या संलग्न ॲन्टफिन (नेदरलँड्स) होल्डिंगच्या माध्यमातून नोएडास्थित वन९७ कम्युनिकेशन्सचे समभाग विकले आहेत. ॲन्ट समूह, ज्याला पूर्वी ॲन्ट फायनान्शियल म्हणून ओळखले जात होते, ही चिनी समूह अलिबाबा समूहाची संलग्न कंपनी आहे. ॲन्ट फायनान्शियलकडून सुमारे ३.७३ कोटी समभाग म्हणजेच ५.८४ टक्के हिस्सा विक्री करण्यात आला. यामुळे कंपनीतील चिनी मालकी शून्यावर आली आहे, ज्यामुळे तिच्या भागधारकांच्या आकारमानात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. या संरचनात्मक बदलाची वेळ देखील महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीच्या मजबूत कामगिरीनंतर कंपनीने १२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो तिचा पहिलीच पूर्णपणे नफा देणारा तिमाही ठरली आहे. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी वाढून १,९१८ कोटी रुपये झाला आहे.

इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीच्या सफलतेनंतर, १९ नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘पेटीएम’चे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले. मात्र त्यावेळी ‘पेटीएम’च्या समभागाने घसरणीसह बाजारात पदार्पण केले होते. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले. डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागांच्या भांडवली बाजारातील सूचिबद्धतेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून १८,३०० कोटी रुपयांची विक्रमी भांडवल उभारणी केली होती. या भागविक्रीसाठी जवळपास दुप्पट (१.८९ पट) भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला.

बुधवारच्या सत्रात पेटीएमचा समभाग १.२३ टक्क्यांच्या वाढीसह १,०६५.६० रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ६८,०६१ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. समभागाने गेल्या महिन्याभरात १३.०९ टक्के तर तीन महिन्यात २१.५६ टक्के परतावा दिला आहे.