मुंबई : वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील फोनपेने प्रस्तुत केलेल्या ‘इंडस ॲपस्टोअर’ने १० कोटी स्मार्टफोन उपकरणांवर वापराचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडल्याची नुकतीच घोषणा केली. वापरकर्त्याला इंग्रजीसह १२ भारतीय भाषांमध्ये इच्छित ॲप शोधण्याची मुभा आणि अन्य स्थानिकीकरण वैशिष्ट्ये हे या यशामागील प्रमुख घटक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गूगल प्ले स्टोअरला स्वदेशी आणि भारतावर केंद्रित पर्याय प्रदान करण्यासाठी धोरणात्मक पाऊल म्हणून फेब्रुवारी २०२४ मध्ये फोनपेकडून इंडस ॲपस्टोअरचे अनावरण करण्यात आले. दीड वर्षात त्याच्या वापराने १० कोटींचा टप्पा ओलांडणे हा सर्वांसाठीच अभिमानाचा क्षण आहे, असे इंडस अॅपस्टोअरच्या मुख्य व्यवसाय अधिकारी प्रिया एम. नरसिह्मन म्हणाल्या.
४० टक्के वापरकर्ते प्रादेशिक भाषेत हे अॅप स्टोअर वापरतात, आणि सर्वात लोकप्रिय भाषा माध्यम हे मराठी, हिंदी, तामिळ आणि गुजराती असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये इंडस ॲपस्टोअरच्या वापरकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती आहे, तर कर्नाटक आणि तेलंगणा ही देखील प्रमुख वापरकर्ता केंद्रे आहेत.
वापरकर्त्यांना एक अखंड, सुरक्षित आणि समृद्ध अॅप निवडीचा अनुभव देणारे इंडस ॲपस्टोअर हे एक परिपूर्ण व्यासपीठ बनले आहे. डेव्हलपर इकोसिस्टमला एकसमान संधीद्वारे समर्थन देण्यासह भारताच्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक स्थितीनुरूप तयार केलेल्या वैशिष्ट्यांसह योग्य वापरकर्त्यांपर्यंत त्यांना पोहोचण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट सफल होत असल्याचे दिसत असल्याचे नरसिह्मन यांनी नमूद केले.
जनरेशन झी, वायचा आधार
देशातील तरुणाई ही इंडस ॲपस्टोअरच्या वाढीला चालना देणारा प्रमुख घटक आहे. १८ ते २७ वर्षे वयोगटातील ‘जनरेशन झी’ वापरकर्त्यांमध्ये ३३.७ टक्के वाटा आहे आणि २७ ते ४४ वर्षे वयोगटातील ‘जनरेशन वाय’सह ४५ वर्षांखालील वापरकर्त्यांमध्ये जवळजवळ ९३.५ टक्के बाजारहिस्सा त्याने मिळविला आहे.
इंडस ॲपस्टोअरचा मुख्य वापरकर्ता टियर ३ श्रेणी शहरांमध्ये २८ ते ४४ वर्षांचे पुरुष आहेत. जवळजवळ ७०.६ टक्के वापरकर्ते टियर ३ श्रेणी क्षेत्रातील आहेत, जे ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये या ॲपस्टोअरच्या मजबूत प्रवेशाला अधोरेखित करतात.