मुंबई: देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर झाले पाहिजे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह असून, या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हरित कर्जरोख्यांद्वारे निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काढले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अपरिवर्तनीय हरित कर्जरोख्यांची मुंबई शेअर बाजारात सूचिबद्धतेचा कार्यक्रम बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, प्रधान सचिव डॉ. के गोविंदराज, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती आदी यासमयी उपस्थित होते.

हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्जरोखे बाजारात आणल्यानंतर केवळ एका मिनिटात शंभर कोटी रुपयांचा मूळ भागाचा भरणा पूर्ण झाला. तर एकूण ५१३ कोटी रुपयांसाठी अर्ज प्राप्त झाले. म्हणजेच या रोख्यांना ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. या हरित कर्जरोख्यांना ‘क्रिसिल’ आणि ‘केअर’ या पतमानांकन संस्थाकडून ‘एए १’ मानांकन प्राप्त झाले आहे. रोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी ७.८५ टक्के असा स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्ज रोख्यांतून हरीत विकास

हरित कर्जरोख्यांद्वारे उभारलेल्या निधीतून पर्यावरणस्नेही पायाभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. अक्षय्य ऊर्जा, शाश्वत वाहतूक आणि हरित इमारती अशा कामांसाठीच तो वापरला जात असल्याने केंद्र शासनाकडूनही हरित कर्जरोखे जारी केल्यामुळे पालिकेला २० कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी हा निधी वापरात येणार आहे.