PM Modi Met Google CEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Google आणि Alphabet चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांच्याशी सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी डिजिटल माध्यमातून चर्चा केली. पीएम मोदींनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google च्या भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन परिसंस्थेच्या विस्तारामध्ये सहभागी होण्याच्या योजनेवर बातचीत केली.
दिल्लीतील AI समीटसाठी आमंत्रित
नवी दिल्ली येथे डिसेंबर २०२३ मध्ये भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या AI समीटबाबत पीएम मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यातही चर्चा झाली. पीएम मोदींनी आगामी एआय समीटमध्ये जागतिक भागीदारीमध्ये योगदान देण्यासाठी Google ला आमंत्रित केले.
पीएम मोदींनी गुगलचे कौतुक का केले?
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सांगितले की, PM मोदींनी भारतात Chromebooks निर्मितीसाठी ‘HP’ बरोबर Google च्या भागीदारीची प्रशंसा केलीय. “पंतप्रधानांनी Google च्या १०० भाषांच्या उपक्रमाचे कौतुक केलं आणि भारतीय भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित उपाय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. त्यांनी गुगलला सुशासनासाठी एआय सोल्यूशन्सवर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले,” असंही पीएमओने म्हटले आहे.
सुंदर पिचाई यांनी गुगलच्या योजनांची माहिती दिली
गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT) मध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याच्या Google च्या योजनेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. पीएमओने सांगितले की, सुंदर पिचाई यांनी ‘गुगल पे’ आणि यूपीआयची पोहोच वाढवून भारतात आर्थिक समावेश सुधारण्याच्या गुगलच्या योजनांबद्दल पंतप्रधान मोदींना माहिती दिली.
काय म्हणाले सुंदर पिचाई?
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, गिफ्ट सिटी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू झाल्याबद्दल आम्हाला माहिती देताना आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे व्हिजन नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे, असंही त्यांनी सांगितलं.