पीटीआय, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील बँकांनी चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबरअखेर तिमाहीत आर्थिक निकाल चांगले नोंदविले आहेत. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँकेसह ॲक्सिस बँकेने तिमाही निकाल जाहीर केले असून, या बँकांच्या नफ्यात मोठी वाढ झालेली आहे.
पीएनबीच्या नफ्यात चारपट वाढ
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात चारपट वाढ नोंदविली आहे. बँकेला १,७५६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जास्त व्याज उत्पन्न आणि थकीत कर्जाची कमी झालेली तरतूद यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेला ४११ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचे व्याज उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून २६,३५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते २०,१५४ कोटी रुपये होते. बँकेच्या थकीत कर्जांचे प्रमाण ६.९६ टक्के आहे.
हेही वाचा… सकाळी आठच्या आधी, रात्री सातनंतर कर्जवसुली नकोच : रिझर्व्ह बँक
ॲक्सिस बँकेच्या नफ्यात १० टक्के वाढ
खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेने दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १० टक्के वाढ नोंदविली आहे. बँकेचा निव्वळ नफा ५,८६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँकेला ५,३३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्याने वाढून १२,३१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेची थकीत कर्जाची तरतूद मात्र वाढली असून, ती ८१५ कोटी रुपयांवर गेली आहे. बँकेचे एकूण उत्पन्न ३१,६६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण १.७३ टक्के आहे.
कॅनरा बँकेला ३,६०६ कोटींचा नफा
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४३ टक्के वाढ नोंदविली आहे. बँकेचा नफा ३,६०६ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचा नफा २,५२५ कोटी रुपये होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पनन १९.७६ टक्क्यांनी वाढून ८,९०३ कोटी रुपयांवर गेले आहे. बँकेची थकीत कर्जाची तरतूद कमी होऊन २,६०८ कोटी रुपयांवर आली आहे. बँकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण ४.७६ टक्के आहे.
इंडियन बँकेला १,९८८ कोटींचा नफा
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेला दुसऱ्या तिमाहीत १,९८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँकेला १,२२५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यात आता ६२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेचे व्याज उत्पन्न १३,७४३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते १०,७१० कोटी रुपये होते. बँकेच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण ४.९७ टक्के आहे.