दावोस : जागतिक पातळीवर क्रिप्टो करन्सीचे (आभासी चलन) मूल्य वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आभासी चलनाबाबत जोखमांचा पुनरुच्चार करताना, यात मोठे धोके असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावरून बुधवारी केली.

हेही वाचा >>> सरकारच्या ‘या’ कंपनीने स्टेट बँकेला टाकले मागे 

आभासी चलनाच्या मूल्यात नजीकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा देत संभाव्य धोकेही मांडले. ते म्हणाले की, आभासी चलन हे कोणतेही निश्चित मूल्य नसलेले आहे. त्याचा भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा धोका आहे. इतर अनेक जणांना पुन्हा नव्याने आभासी चलनाची ‘पार्टी’ सुरू असल्याचे दिसत असले तरी हा जोखीमयुक्त मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेतील भांडवली बाजार नियंत्रक संस्थेने आभासी चलनांच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडांना (ईटीएफ) परवानगी दिली आहे. याबाबत दास म्हणाले की, इतर देशांचे अनुकरण करणे ही भारतीय नियामकांची भूमिका नाही. त्यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या देशासाठी योग्य असू शकतील. आपण घेतलेले निर्णय आपल्या देशासाठी योग्य असतात.

हेही वाचा >>> ‘आत्मनिर्भर एसआयपी’ सुविधा माहिती आहे का?

आधीही अनेक वेळा विरोध

आभासी चलनाला शक्तिकांत दास यांनी याआधीही जाहीरपणे विरोध केला आहे. आभासी चलनामुळे वित्तीय स्थिरतेला धोका निर्माण होऊन जागतिक वित्तीय संकट येऊ शकते, असा इशाराही त्यांनी आधी दिला होता. भारतासाठी आभासी चलन हे खूप वाईट आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही जणांकडून आभासी चलनाची नववर्षाची ‘पार्टी’ साजरी करण्यावर भर दिला जात आहे. परंतु, ते काही वर्षांपूर्वी झालेली पडझड विसरत आहेत. अस्थिरता, करचुकवेगिरी आणि दहशतवादी कारवायांना अर्थसाह्य असे अनेक आभासी चलनाचे धोके आहेत. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक