मुंबई : चालू आर्थिक वर्षात वित्तीय क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) नैतिक अवलंब सुरू करण्यासाठी लवकरच नियामक चौकट तयार केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने ताज्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.

प्रचंड प्रमाणावर वाढणारे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल आकडेवारीच्या मोठ्या प्रमाणावरील उपलब्धतेमुळे बँकिंग कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. संगणक प्रणालीतील जलद बदलांमुळे एआय आणि मशीन लर्निंगसारख्या (एमएल) तंत्रज्ञान अधिक अद्ययावत झाले आहे. शिवाय जागतिक आणि देशांतर्गत वित्तीय संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. बदलत्या काळानुसार पावले टाकत वित्तीय क्षेत्रात एआयच्या वापराला प्रोत्साहन म्हणून रिझर्व्ह बँकेने नियामक चौकट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक स्वतःच्या कार्यात एआय आणि एमएल-चालित उपायांची अंमलबजावणी करत आहे. यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी एक बाह्य समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये वित्तीय क्षेत्रात एआयच्या सक्षमीकरणासाठी चौकट शिफारस करण्याचे अधिकार असलेल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतींनुसार बँकिंग आणि बँकेतर क्षेत्रांच्या नियामक आणि पर्यवेक्षी चौकटीला अधिक मजबूत करून वित्तीय व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. नियमन केलेल्या संस्थांमध्ये नियमांचे तर्कसंगतीकरण आणि सुसंवाद साधण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहे. तसेच तक्रार व्यवस्थापन आणि तक्रार निवारण यंत्रणेच्या सुव्यवस्थेसाठी एआयचा वापर केला जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.