पीटीआय, नवी दिल्ली
रिलायन्स रिटेलने शुक्रवारी इलेक्ट्रोलक्स समूहाकडून तिची ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा ‘केल्व्हिनेटर’चे अधिग्रहण करण्याची घोषणा शुक्रवारी केली. हा व्यवहार सुमारे १८० दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच सुमारे १६० कोटी रुपयांना पार पडला.
रिलायन्स रिटेलने यापूर्वीपासूनच इलेक्ट्रोलक्स होम प्रॉडक्ट्स इन्कच्या परवान्याअंतर्गत केल्व्हिनेटरच्या उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. या नाममुद्रेअंतर्ग भारतात रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, एअर कूलर आणि वॉशिंग मशीनसह विविध उत्पादनांची विक्री केली जात आहे.
केल्व्हिनेटरचे अधिग्रहण आमच्यासाठी महत्त्वाचे असून भारतीय ग्राहकांना विश्वासार्ह जागतिक नवोपक्रम आणि वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यापक सेवा क्षमता आणि बाजारपेठेतील आघाडीच्या वितरण जाळ्याद्वारे उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी म्हटले आहे.
भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंचा बाजार आहे आणि २०२७ पर्यंत तो चौथ्या क्रमांकाचा होईल अशी अपेक्षा आहे. २०२९ आर्थिक वर्षापर्यंत बाजारपेठेचा आकार ३ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. ‘क्रिसिल’च्या मते, २०२५ च्या आर्थिक वर्षात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्राची (टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी आणि वॉशिंग मशीन) एकूण बाजारपेठेचा आकार सुमारे १.१७ लाख कोटी रुपये आहे.