मुंबईः वाहनांच्या वधारलेल्या किमती आणि विक्रीतील वाढ जेमतेम ३-४ टक्के राहण्याचे अंदाज सुरू असताना, किमतीच्या बाबतीत सर्वात स्पर्धाशील आणि करांच्या दृष्टीने कार्यक्षम ‘रेनॉ ट्रायबर’ २०२५ च्या आवृत्तीचे मुंबईत मंगळवारी ६.२९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत अनावरण करण्यात आले. भारतात एकंदर मरगळलेल्या वाहनांच्या मागणीला चालना देण्यात या नव्याने दाखल एसयूव्हीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल, अशी या फ्रेंच वाहननिर्मात्यांना आशा आहे.

रेनॉ ट्रायबर हे भारतातील सर्वात परवडणारे बहुपयोगी वाहन (एमपीव्ही) आहे आणि नव्या आवृत्तीतील अद्ययावत वैशिष्ट्यांच्या समावेशानंतरही या वाहनाचा हा परवडणारा घटक कायम राहिला आहे. नवीन रेनॉ ट्रायबर एमपीव्ही चार प्रकारांमध्ये उपलब्ध असेल आणि त्यांची किंमत ६.२९ लाख रुपये ते ९.१६ लाख रुपयांपर्यंत असेल. शिवाय ४ मीटरपेक्षा कमी श्रेणीतील हे सात आसनी वाहन असल्याने त्यावरील वस्तू आणि सेवा कराचे प्रमाण निम्नतम असेल.

रेनॉच्या जागतिक विक्रीत भारताचा वाटा दोन टक्क्यांपेक्षा कमी असला, तरी छोटेखानी सात-आसनी ट्रायबर, हे कंपनीचे भारतात सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे आणि याचाच अधिकाधिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न राहिल, असे रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले. लक्षणीय म्हणजे चार वर्षांहून अधिक काळानंतर रेनॉचे दाखल झालेले हे नवीन वाहन आहे.

गत आर्थिक वर्षात भारतातील वार्षिक ४३ लाख प्रवासी कार विक्रीपैकी एसयूव्ही आणि तीन-पंक्ती आसन व्यवस्था असणाऱ्या कौटुंबिक कारचा वाटा सुमारे ६५ टक्के राहिला. त्या उलट पाच वर्षांपूर्वी विक्रीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असलेल्या छोट्या कारची हिस्सेदारी उत्तरोत्तर घटत चालले आहे. रेनॉची या सर्वाधिक खपाच्या कौटुंबिक वाहन श्रेणीवर अधिक भर राखतानाच, किमतीच्या बाबतीत वेगळेपणही जपायचे असल्याचे ममिल्लापल्ले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन काय?

बाह्य रूपात पूर्ण कायापालट, नवीन ग्लॉस-ब्लॅक ग्रिल, नवरचित हेडलॅम्प आणि डीआरएल ही नवीन ट्रायबरची वैशिष्ट्ये ठरतील. अंतर्गत रचनेत, ट्रायबरमध्ये परिपूर्ण डिजिटल उपकरणांचे क्लस्टर, अँबियंट प्रकाश योजना, ३६० अंश कोनातून चित्रण करणारा कॅमेरा आणि वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह ८-इंची पडदा असलेल्या इन्फोटेनमेंट प्रणालीने ती सुसज्ज आहे. नवीन ट्रायबर ही अंबर टेराकोटा, शॅडो ग्रे आणि झंस्कर ब्लू अशा तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. एकूणच बाह्य रचनेतील बदलासह नवीन रंग ट्रायबरला अधिक प्रीमियम रुपडे प्रदान करतात.