नवी दिल्लीः किरकोळ महागाईचा पारा कमी झाला असून, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये त्यात जवळपास अर्ध्या टक्क्यांची घट झाल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून समोर आले. भाज्या आणि डाळींच्या किमतीत झालेली घसरण यासाठी कारणीभूत ठरली.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात २.०७ टक्के होता. त्यात घसरण होऊन तो सप्टेंबरमध्ये १.५४ टक्के म्हणजे आठ वर्षांतील नीचांकी पातळीवर रोडावला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा दर ५.४९ टक्के होता. खाद्यवस्तूंच्या किमतीत सप्टेंबरमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. भाज्या, खाद्यतेल, फळे, डाळी, तृणधान्ये, अंडी, इंधन आणि ऊर्जा यांच्या किमती मोठ्या फरकाने नरमल्याचा हा परिणाम आहे, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिली. यंदा सप्टेंबरमध्ये खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर उणे २.२८ टक्के नोंदविण्यात आला आहे. हा दर ऑगस्टमध्ये उणे ०.६४ टक्के तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ९.२४ टक्के अशा चिंताजनक स्तरावर होता.
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमधील द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा दराचा अंदाज २.६ टक्क्यांवर आणला आहे. त्याआधी ऑगस्टच्या पतधोरणात हा अंदाज ३.१ टक्के होता. समाधानकारक मोसमी पाऊस, खरीपाची जास्त झालेली पेरणी, धरणांतील पुरेसा पाणीसाठा आणि धान्याचा पुरेसा साठा यामुळे धान्याच्या किमतीत नियंत्रणात राहणार आहेत, असेही रिझर्व्ह बँकेने महागाई अंदाजात नमूद केले आहे. सप्टेंबरसाठी महागाई दराची जाहीर आकडेवारी रिझर्व्ह बँकेच्या अनुमानाशी जुळणारी आहे.
चलनवाढ ऑक्टोबरमध्ये १ टक्क्यांखाली शक्य
सप्टेंबरमध्ये मंदावलेला दर ही सौम्य चलनवाढीच्या वातावरणाच्या टिकाऊपणाकडे निर्देश करते. अन्नधान्याच्या किमतींमुळे बहुतांश प्रमाणात घट झाली असली तरी, गृहनिर्माणामुळे मुख्य (कोअर) चलनवाढ वाढली आहे. तथापि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कपातीचा फायदे चालू महिन्यात अधिक स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे ऑक्टोबरमधील चलनवाढीचा आकडा १ टक्क्यांच्याही खाली जाण्याची शक्यता आहे, असे कोटक महिंद्र बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी मत व्यक्त केले.