पीटीआय, नवी दिल्ली
भाज्या, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांसह अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर २.८२ टक्क्यांवर घसरला, असे गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने नोंदवले. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित हा महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यांत ३.१६ टक्के, तर गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२४ मध्ये ४.८ टक्के नोंदवला गेला होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यान्न महागाई दर ०.९९ टक्क्यांवर मर्यादित राहिला, जो मागील वर्षीच्या याच महिन्यातील ८.६९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर होता. एप्रिल महिन्यातील १.७८ टक्क्यांच्या पातळीपेक्षा लक्षणीय खाली नोंदवला गेला आहे. मे २०२५ मध्ये प्रमुख महागाई दरात लक्षणीय घसरणीसाठी खाद्यान्नांच्या नरमलेल्या किमतीच कारणीभूत ठरल्या आहेत. प्रामुख्याने डाळी आणि त्यावर आधारीत उत्पादने, भाज्या, फळे, धान्य आणि संलग्न उत्पादने, घरगुती वस्तू, साखर आणि मिठाई आणि अंडी यांच्या किमती घटल्याने एकंदर महागाई दरात उतार दिसला आहे.
सरलेल्या मे महिन्यातील खाद्यान्न महागाई दर हा ऑक्टोबर २०२१ नंतरच्या नीचांकी पातळीवर ओसरला आहे. प्रमुख घटकांमध्ये, भाज्यांच्या किमतीत वार्षिक आधारावर १३.७ टक्क्यांची तीव्र घट दिसून आली. आधीच्या एप्रिलमध्ये त्यात वार्षिक तुलनेत ११ टक्क्यांची घट दिसून आली होती. मे महिन्यात धान्याच्या किमतीतील महागाई दर ४.७७ टक्के नोंदवला गेला आहे, जो एप्रिलमधील ५.३५ टक्क्यांच्या किमत वाढीपेक्षा कमी आहे. दरम्यान, डाळींच्या किमती ८.२२ टक्क्यांनी घसरल्या, ज्या मागील महिन्यात ५.२३ टक्क्यांनी घसरल्या होत्या.
तज्ज्ञांच्या मते, अनुकूल मान्सून, कृषी उपजाचा चांगला पुरवठा आणि जागतिक कमॉडिटीच्या किमती कमी झाल्याने वर्षभर महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याला अनुरूप राहण्याची आशा आहे. खाद्यतेलावरील सीमाशुल्क अर्ध्यावर आणण्याच्या सरकारने अलिकडेच उचलेल्या पावलामुळे किमतीवरील ताण आणखी सैल होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या खाद्यतेलाच्या वापरात आयातीचा वाटा सुमारे ६० टक्के आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाचा महागाई दर दुहेरी अंकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेल महागाई दर १३ टक्क्यांपुढे कायम आहे.
आणखी व्याजदर कपात शक्य
किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेकडून निर्धारीत ४ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा सलग चौथ्या महिन्यांत कमी राहिला आहे, तर ग्राहक किंमत निर्देशांकात जवळपास निम्मे योगदान असलेली खाद्यान्न महागाई सलग तीन महिन्यांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. याचाच पूर्वअंदाज म्हणून ६ जूनला जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ साठी महागाई दराचे अनुमान ४ टक्क्यांवरून आणखी कमी करून ३.७ टक्के केला आणि थेट अर्धा टक्के व्याजदर कपातीचे आक्रमक पाऊल टाकल्याचेही दिसून आले. किरकोळ महागाई दराचे ताजे आकडे पाहता, अर्थव्यवस्थेला उत्तेजन म्हणून चालू वर्षात आणखी व्याजदर कपात होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजांच्या तुलनेत कमी महागाई आणि कमी अर्थवृद्धीचे अंदाज पाहता, ऑक्टोबर २०२५ मध्ये चालू वर्षातील शेवटची पाव टक्क्यांची व्याजदर कपात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तोवर पाऊस आणि त्याचा खाद्यान्न महागाईवरील परिणामही स्पष्ट झालेला असेल.- आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा